Breaking News

पहाटे सूर्योदयापर्यंत मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान घेतलं जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान होत असून अनेक मतदार मतदान न करताच माघारी गेल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर हल्लाबोल केला आहे.ठाकरे गटाला ज्या ठिकाणी जास्त मतदान पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला जात आहे,मतदारांना मुद्दाम ताटकळत ठेवलं जात असल्याचं दिसतंय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

मतदान करताना ज्या बुथवर असा वेळकाढूपणा केला जात आहे, तेथे असणाऱ्या पोलिंग एजंटांनी जवळच्या शिवसेना शाखेत आपल्या तक्रारींची नोंद करा. निवडणूक प्रतिनिधींची नावे विचारुन घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी सरकारच्या डावाला बळी पडू नका, पहाटेचे पाच वाजले तरीही मतदान करुनच बाहेर या, रांगेतून अजिबात हटू नका व एकाही निवडणूक अधिकाऱ्याला सोडू नका.कितीही वेळ लागला तरी मतदारांनी मतदान करूनच बाहेर यावे, जे मतदार मतदान न करताच घरी गेले आहेत, त्यांनी पुन्हा मतदान केंद्रात येऊन मतदान करावं, असं आवाहनही ठाकरेंनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, मतदान केंद्रावर दिरंगाई सुरूच आहे. मतदान केंद्रात गेल्यावर मतदारांना तुमचं नाव काय? तुमच्या भावाचं नाव काय, असं म्हणत वेळकाढूपणा केला जात आहे. मतदारांना फोन आणू नका असे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरूआहे. मात्र मतदारांनी मतदान केंद्रातून मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

मुंबईतील अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असून मतदार मतदान न करताच माघारी गेले आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहे. मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून खूप दिरंगाई होत आहे. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, संपूर्ण दिवसभर मतदानाची माहिती मी घेत आहे. मतदारांमध्ये खूप उत्साह आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला मतदान करा, म्हणून मेसेजकेलेजात आहेत. त्याप्रमाणे मतदार उतरल्याचे दिसत आहे. पण, निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहे. मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून खूप दिरंगाई होत आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या मतदान केंद्रावर आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणाचा अनुभव आला असेल त्या ठिकाणच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचं नाव विचारावं,नोंद करावं. अशांची माहिती गोळा करून आम्ही कोर्टात जाऊ. मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत असलं तरी मतदान करा. जे मतदार कंटाळून परत गेले आहेत त्यांनी पुन्हा केंद्रावर जाऊन मतदान करावं असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.