kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जनतेचे… समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत – अजित पवार

विरोधक राज्यपालांना सरकार बरखास्त करण्यासाठी भेटायला गेले होते. ज्या घटना घडल्या त्याचे मी समर्थन करणार नाही. परंतु राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असे भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपण २६ /११ ची घटना पाहिली आणि अनुभवली आहे. सरकारे येतात जातात मात्र जनतेचे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

माझ्या राजकीय आयुष्यात तीन वेळा पंजावर निवडून आलो आहे असे सांगतानाच सत्तेत जास्त काळ आमचा गेला आहे. महायुतीत असलो तरी आम्ही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. अनेक जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने मुंबई आणि राज्यात राहत आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. वारेमाप आश्वासन देणे ही राष्ट्रवादीची कालही – आजही भूमिका नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. बाबा सिद्दीकी यांनी आयुष्यात एका जातीचे कधी काम केले नाही तर सर्व धर्माचे ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या कामाच्या बळावर ते जनतेतून निवडून आले आहेत. सुनिल दत्त यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला नाही. राजकारणात सातत्याने निवडून येणारा माणूस जनतेची काम करत असतो. लोकांमध्ये समरस व्हावे लागते त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात त्याचपध्दतीने बाबा सिद्दीकी काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

मुंबईत आमच्या मंत्र्यांना सांगून त्यांच्याशी चर्चा करून अनेक विकासकामे पूर्ण केली जात आहेत. याचा फायदा मुंबईकरांना झाला पाहिजे. बांधकाम कामगाराचे एक महामंडळ काढले होते. त्याचे हसन मुश्रीफ यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले. असंघटित कामगारांसाठीही आपल्याला काम करायचे आहे असा शब्दही अजित पवार यांनी दिला. विरोधी पक्षात राहून कामे होत नाहीत. विरोधाला विरोध करावा लागतो, आंदोलने करावी लागतात. त्यातून प्रश्न तडीला जात नाही. त्यामुळे निधी देण्याकरिता किंवा कामे करण्यासाठी सत्तेत असावे लागते असेही अजित पवार म्हणाले. आज अनेक तरुणांनी पक्षात प्रवेश केला. या तरुणांचा जोश राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी होणार आहे. बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या सर्व समर्थकांची भविष्यात चांगली मदत झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अंतर देण्याचे काम होणार नाही. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आजपासून नवा प्रवास सुरू केला आहे. आमच्या परिवाराचे सदस्य झाला आहात. पक्षात तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही तुमचा मान – सन्मान राखला जाईल. जुन्या नव्याचा समन्वय साधून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण केले तेच बेरजेचे राजकारण करण्याचे काम करुन दाखवू. त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, त्यांनीच महाराष्ट्राला दिशा दिली आहे ती दिशा कधी चुकू देणार नाही अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली.