Breaking News

“राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, – अर्जुन खोतकर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पुढच्या काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने राजकीय नेते मंडळींनी आतापासून कामाचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यातच महाविकास आघाडीतील काही नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच शिवसेना (शिंदे) पक्षाचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ’, असा इशारा अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमकी कोणाकडे? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात विरोधकांनी केलेल्या टीकेबाबत अर्जुन खोतकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “विरोधकांचं काम हे टीका करण हेच असतं. ज्या गोष्टी झालेल्या नाहीत त्या सांगणं, जे झालं ते सांगितलं तर विरोधक खरं बोलतात ते सिद्ध झालं असतं. देशाचा अर्थसंकल्प हा आरसा असतो. त्यामध्ये देशाच्या विकासाचं प्रतिबिंब दिसत असतं. अर्थसंकल्प चांगला आहे की नाही हे विरोधकांनी ठरवायचं नसतं तर देशातील लोकांनी ठरवायचं असतं. अर्थसंकल्पावर जनता खूश आहे. त्यामुळे टीका करणं हे विरोधकांचं काम आहे ते त्यांनी करत राहावं”, असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का बसला. तसेच आणखी काही पदाधिकारी महायुतीत येणार असल्याची चर्चा आहे असा प्रश्न अर्जुन खोतकर यांना विचारला असता ते म्हणाले, “महाविकास आघाडीतील महत्वाची ८ लोक आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे लोकांचा कल यावरून समजून येतो. आता ८ जण आले असले तरी पुढच्या काळात अनेकजण आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच यावेळी कोणत्याही परिस्थितीत जालना महापालिकेत शिवसेना (शिंदे) पक्षाचा महापौर असेल”, असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एक विधान केलं होतं. ‘जालन्यात राजकीय भूकंप कसे कसे येतात तुम्ही पाहा’, असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच विधानासंदर्भात आता अर्जुन खोतकर यांना प्रश्न विचारला असता अर्जुन खोतकर म्हणाले, “ते फक्त बोलतात. त्यांच्या बोलण्याला काही आधार नसतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही फार गांभीर्याने पाहू नका. मला वाटतं की राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ”, असा मोठा इशारा अर्जुन खोतकर यांनी कोणाचंही नाव न घेता दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *