राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतरही सत्तेच्या सारीपाट सुरु आहे. निकाल लागून सात दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण? हे अजून निश्चित झालेले नाही. शिवसेना नेते आणि राज्याचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला महायुतीच्या बैठकीसाठी गेले होते. त्या बैठकीतून परतल्यानंतर साताऱ्यातील दरे गावी पोहचले. त्यामुळे राज्यभरात वेगवेगळी चर्चा सुरु झाली. त्यातच त्यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती समोर आली. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी आता एकनाथ शिंदे यांना नेमके काय झाले? त्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आहे. त्यांना 99 डिग्री ताप आहे. सर्दी झाल्यामुळे त्यांच्या घशाला इन्फेक्शन झाले आहे. व्हायरल संक्रमण त्यांना झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु केले आहेत. त्यांना सलाइन लावण्यात आली आहे. कालपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. आता त्यात बरीच सुधारणा झाली आहे. आज त्यांनी आमच्याशी गप्पाही केल्या. आता चार डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. ते उद्या मुंबईला जाणार आहे, अशी माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी माध्यमांना दिली.
महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि जे.पी.नड्डा होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे सरळ सातारामधील आपल्या दरे गावी पोहचले. मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द करावी लागली. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हा दावा फेटळण्यात आला.