kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

माधवी महाजनी यांनी पुस्तकात सांगितलेला किस्सा नेमका काय? जाणून घ्या

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी व अभिनेता गश्मीर महाजनीच्या आई माधवी महाजनी यांचं ‘चौथा अंक’ नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या पुस्तकात माधवी यांनी त्या वानखेडे स्टेडिअममध्ये नोकरी करत होत्या, त्यावेळचा एक किस्सा सांगितला आहे. माधवी नोकरी करत असताना त्रास दिला जात होता, त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंना कळालं आणि त्यांनी दम दिला होता, असा खुलासा माधवी यांनी केला आहे.

त्यांनी लिहिलंय, “वानखेडे स्टेडिअममध्ये मी मेनटेनन्सचं काम करीत होते. माझ्या हाताखाली आठ मुलं होती. स्वच्छता, स्टॉक बघणे ही कामं मी बघायचे. तिथल्या स्टाफपैकी मी एकटीच पदवीधर. पण त्यातून तिथल्या काही मुलांच्या मनात माझ्याबद्दल आकस निर्माण झाला. आमच्या ऑफिसमध्ये दोनदा लेटमार्क चालत असे, पण त्याच महिन्यात तिसरा लेटमार्क झाला की एका दिवसाचा पगार कापला जाई. स्टाफची ती मुलं माझ्या नावापुढे लेटमार्क झाल्याचं दर्शवण्यासाठी लाल चौकोन करायची.”

पुढे माधवी यांनी लिहिलंय, “एकदा मी ऑफिसमधून घरी आले. रवीची मुलाखत घेण्यासाठी कुणी पत्रकार बाहेर बसला होता. मी आल्यावर रवीही आतमध्ये आला. माझ्या मनात राग खदखदत होता. सगळं काम मी नीट करत असतानाही माझे रेकॉर्ड कुणीतरी खराब करत होतं. घरी आल्यावर मी त्याबद्दल रवीला सांगितलं. मुलाखत घेणारा तरुण मुलगा होता, त्याच्या कानावर आमचं संभाषण गेलं. त्याने आमच्याशी काहीही न बोलता परस्पर बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नीला फोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ त्याने माझ्यासाठी घेतली आणि तसं सांगितलं. आम्हाला कळाल्यावर आम्ही म्हटलं ‘अरे, एवढीशी गोष्ट थेट बाळासाहेबांना कशाला सांगायची? याची काहीही गरज नव्हती’. पण त्यांच्या भेटीची वेळ त्याने घेतली होती.”

“ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाळासाहेबांकडे गेले. माझे सासरे ह.रा. महाजनी यांचं नाव बाळासाहेबांच्या हस्तेच आमचं घर असलेल्या रस्त्याला दिलं गेलं होतं. त्या दिवशी तो समारंभ झाल्यावर बाळासाहेब आमच्या घरी येऊन चहा घेऊन गेले होते. मी त्यांच्या घरी गेले तेव्हा बाळासाहेबांनी त्यावेळचा त्यांचा युनियन लीडर मोरेला मातोश्रीवर बोलावलं. तो आला तेव्हा खूप घाबरलेला होता, घाम पुसतच तो आला होता. बाळासाहेबांनी त्याला फैलावर घेतलं. ‘या कोण आहेत माहितीये का? यांच्या वाटेला कोणी गेलं तर बघा’, असं त्याला सुनावलं. मीनाताईही घरी होत्या, त्यांनी मला आत बोलावलं. आमचं बोलणं वगैरे झालं. त्यानंतर मात्र मला ऑफिसमध्ये कुणी त्रास द्यायला धजावलं नाही,” असं माधवी महाजनी यांनी या पुस्तकात सांगितलं आहे.