:राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक शाखेत एकत्र येतात, शाखेने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, व्यायाम करतात, देशभक्तीपर गीते गातात, मैदानी खेळ खेळतात, भारतात खेळले जाणारे जुने सांघिक, मैदानी खेळ खेळतात, पुस्तके वाचतात, अध्यन करतात, यासह अन्य अनेक उपक्रम घेतात, यशस्वीपणे राबवले जातात, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी दिली.

पुढील वर्षी २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. गेली ९९ वर्ष संघ देशभरात कार्य करत आहे. परंतु, इतकी वर्ष सुरू असलेल्या संघाच्या शाखेत कधी मुली किंवा तरुणी का दिसत नाहीत? असा प्रश्न सुनील आंबेकर यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बोलताना सुनील आंबेकर म्हणाले की, संघाच्या शाखांमध्ये मुलांसह मुलींनाही सहभागी व्हायचे असल्याची कुठलीही मागणी समाजातून आलेली नाही. मुले व मुली एकत्र शाखांमध्ये सहभागी होण्याबाबत कधी लोकांनी मागणी केली नाही, असे सुनील आंबेकर यांनी सांगितले.

सामाजिक स्तरावर आरएसएसच्या शाखा केवळ मुलांसाठी, तरुणांसाठी आहेत. परंतु, आमची राष्ट्र सेविका समिती आहे. ही संघाचीच महिला संघटना आहे. १९३० पासून ही संघटना संघाप्रमाणेच काम करत आहे. एखाद्या भागातील लोकांनी मागणी केली की, मुलीही मुलांबरोबर शाखेत सहभागी होऊ इच्छितात, तर आम्ही आमच्या शाखेच्या संरचनेत नक्कीच बदल करू. आजवर अशी कुठलीही मागणी समोर आली नाही. समाजातून आजवर बदलाची मागणी आली नाही. त्यामुळे शाखेत मुली सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या नाहीत. मुलांना व मुलींना शाखांमधील अभ्यासात, खेळात, व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास अनुकूल असेल तर आम्ही नक्कीच त्यासाठी योग्य पावले उचलू. आम्ही संघ शाखांच्या संरचनेत बदल करू, असे आंबेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पूर्वी भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासत होती, मात्र आता भाजपा स्वयंपूर्ण झाली आहे, अशा आशयाचे विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले होते. यावरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले होते. विरोधकांनी भाजपा आणि संघावर टीका केली होती. याबाबत आंबेकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, आम्ही कौटुंबिक वाद कुटंबातच सोडवतो. सार्वजनिक मंचांवर अशा विषयांवर चर्चा करत नाही, असे आंबेकर म्हणाले. ते इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलत होते.