महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीचा जोरदार प्रचार करत असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवसभरात तीन ते चार सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी आज अमित ठाकरे यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत संवाद साधला. दरम्यान, अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना राज ठाकरेंना निवडणूक का लढवावी वाटत नाही, याचा एक प्रसंग त्यांनी आज जाहीर सभेत सांगितला.
राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे किंवा माझ्या वडिलांनी मला कोणती गोष्ट करा अथवा करू नका, असं कधीच सांगितलं नाही. त्यामुळे मीही माझ्या मुलाला काही सांगत नाही. त्याला जे वाटेल ते करावं. त्याला निवडणुकीला उभं राहावं वाटलं तर त्याने राहावं. पण मला कधी निवडणुकीत उतरावं असं वाटत नाही. कारण, मी ज्या मुशीतून वर आलोय, त्यामुळे मला असं काही वाटत नाही, असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक प्रसंग सांगितला.
राज ठाकरे म्हणाले, १९७४ सालची ही गोष्ट आहे. आमचे माने नावाचे वाहनचालक आले नव्हते. त्यावेळी शिवेसना भवनही नव्हतं. वांद्र्याला ब्लू पल नावाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील खोलीत शिवसेनेचे कार्यालय होते. मी आणि बाळासाहेब त्या कार्यालयात जायला निघालो. तेवढ्यात तत्कालीन महापौर सुधीर जोशी आले. त्यांची इम्पाला मोठी लाल दिव्याची गाडी होती. त्यांना बाळासाहेबांशी बोलायचं होतं. त्यांचं बोलून झाल्यावर बाळासाहेब बाहेर आले.
तेवढ्यात सुधीरभाऊंनी विचारलं कुठे जाताय? मी सोडतो. तर बाळासाहेब म्हणाले, तुमचे दिवे तुमच्यापाशी राहु देत. मी नाही तुमच्या दिव्याच्या गाडीत बसणार. मी हे सगळं ऐकत होतो आणि मग आम्ही टॅक्सीने निघालो. वांद्र्याच्या ब्रिजवर असताना मी मागे वळून पाहिलं तर एका टॅक्सीच्या मागे लाल दिव्याची गाडी होती. तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता, ती व्यक्ती माझ्या शेजारी बसली होती. आता मला सांगा हे चित्र ज्या मुलाने पाहिलं असेल त्याला खुर्चीचा सोस असेल का?, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंची आज सायंकाळी सात वाजता बोरिवलीत सभा पार पडली. त्यानंतर राज ठाकरे यांनी वर्सोवा आणि प्रभादेवी येथे सभा होणार होती. बोरिवली येथील सभेत ४५ मिनिटे भाषण केल्यानंतर राज ठाकरे सभा आटोपून जाणार होते, तेवढ्यात वर्सोवा येथून पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांना फोनवरुन निरोप आला. वर्सोवा येथील सभेत राज ठाकरे यांचे बोरिवलीतील भाषण मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बोरिवली येथून वर्सोव्यासाठी भाषण करत आणखी १५ मिनिटे बोलले. राज ठाकरेची वर्सोव्याची सभा रद्द केली.