महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय गुजरातमध्ये पळविण्याचे सत्र दहा वर्षांपासून सुरूच आहे. आता राज्य सरकारी सेवादेखील गुजरातच्या घशात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. या सेवा चालवण्यासाठी गुजरातमधील कंपन्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. योजना सुरू करायच्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या नावाने, परंतु वेळ आली की त्यांच्या तोंडचा घास काढून तो गुजराती कंपन्यांच्या घशात कोंबायचा, हे उद्योग थांबण्याची चिन्हे नाहीत, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अर्थात सेतू सुविधा केंद्राबाबत हेच घडले आहे. सिंधुदुर्गातील एकूण 9 सेतू सुविधा केंद्र चालविण्यासाठी गुजराती कंपनीकडे सोपवण्यात आल्याबाबतही त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. यासोबत ठाकरेंनी राणें बंधूंवर टीका केली आहे.

सिंधुदुर्गातील एकूण 9 सेतू सुविधा केंद्र चालविण्यासाठी गुजराती कंपनीकडे सोपविण्यात आली आहेत. मे. गुजरात इन्फोटेक असे या कंपनीचे नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासह देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग ही तालुका नागरी सुविधा केंद्र आता ही कंपनी चालविणार आहे. राज्यातील महायुती सरकारने तसा करारनामाच या कंपनीशी केल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे.

वास्तविक ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण डोळ्यांसमोर ठेवून सुरू करण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार-स्वयंरोजगाराचा एक मार्ग म्हणून या केंद्राकडे पाहिले जाते. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे कोणीच लायक सुशिक्षित बेरोजगार सरकारला सापडले नाहीत का, स्थानिकांना या केंद्राचा ठेका द्यावा, असे त्यांना का वाटले नाही? अहमदाबादची एक कंपनी आणून ती सिंधुदुर्गातील जनतेच्या बोकांडी बसविण्याचे उद्योग कोणासाठी केले, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच हिंदूंवरील अन्याय सहन करणार नाही, अशा वल्गना करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘स्वयंघोषित ठेकेदार’ आता स्थानिक बेरोजगारांवरील अन्यायाबाबत कुठे तोंड लपवून बसले आहेत, अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे हे गुजरातप्रेम कोणी चव्हाट्यावर आणले तर विद्यमान मुख्यमंत्री त्याला ‘फेक नरेटिव्ह’ म्हणून मोकळे होतात. मग आता सिंधुदुर्गातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ तुमच्याच सरकारने थेट गुजराती कंपनीला चालवायला दिली आहेत, यावर तुमचे काय म्हणणे आहे? या ‘नरेटिव्ह’चे बाप कोण?” असा प्रश्न करत ठाकरेंनी फडणवीसांवरही टीका केली आहे.