यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सांस्कृतिक गुढी उभारण्याचा मान आमच्या सारख्या कलाकारांना मिळतो, हे आमचे यश आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखा गेली, अनेक वर्षे कलाकारांना मान देऊन खर्या अर्थाने कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात ऊर्जा देण्याचे काम करीत आहे, अशी भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कर्हाडे व सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखातर्फे आयोजित गुढीपाडव्याचे औचित्य साधून कलावंताच्या सांस्कृतिक गुढीचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मंगळवारी करण्यात आले होते. सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कर्हाडे व सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते गुढी उभारुन पुजा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखाचे व ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, निर्माते चंद्रशेखर गोखले, रोहित शुक्ला, दिशा थोरात, गिरिश गोडबोले यांच्यासह कोथरुड नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखाचे व ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची नुकतीच एकसष्ठी पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांचा 61 गुलबांचा बुके देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजेश्वरी पवार यांनी ’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर करून केले. दिशा हटकर यांनी गणेश वंदना व श्रध्दा गायकवाड यांनी ‘आजी सोनियाचा दिवस’ हे गीत सादर केले.
अभिनेते संकर्षण कर्हाडे म्हणाले, नाट्य परिषद कोथरुड शाखा थिएटरमध्ये गुढी उभारुन कलाकारांना ऊर्जा देत असते. अनेक कलाकार माणसे जोडण्याचे काम या शाखेकडून होते. अभिनेत्री स्पृहा जोशी म्हणाल्या, नाट्य परिषद आता 100 वे वर्षे साजरे करीत आहे. कोथरुड शाखा विविध उपक्रम राबून कलाकरांना बळ देते. आज आमच्या हातून गुढी पुजन करण्यात आले, हे आमचे भाग्यच आहे.
महाराष्ट्रात थियटरमध्ये गुढी उभारणचे काम फक्त कोथरुड मध्येच होते. शाखेचे वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. नाट्यगृह हेच आमचे घर मानून आम्ही दरवर्षी सांस्कृतिक गुढी उभारण्यात येते. यंदाचे हे 15 वे वर्ष आहे. अनेक कलाकारांना हा मान देण्यात आला असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखाचे व ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर हंपी यांनी केले. सत्यजीत धांडेकर यांनी आभार मानले.