kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सध्या पुढे आली आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अभिजित राठोड यांच्यासह प्रकाश आंबेडकर आणि वंचितला निवडणुकांपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे.

विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपला नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल 4 एप्रिलच्या दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार आहे. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीने 4 एप्रिल रोजी उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलून सुभाष खेमसिंग पवार यांच्या एवजी युवा उमेदवार असलेल्या अभिजित राठोड यांना संधि दिली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघासाठी नामांकन दाखल करायच्या शेवटच्या दिवसाअखेरीस एकून 38 उमेदवारांची 49 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केले गेले. तर आज 5 एप्रिल रोजी या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे.

त्यामध्ये महायुतीतून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांची उमेदवारी देखील महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात असताना त्यांच्या उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याने सध्याघडीला मंतदारसंघात नवा ट्विस्ट आल्याचे चित्र आहे. तर आतापर्यंत 38 उमेदवारांपैकी इतर किती उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरल्या जातात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.