Breaking News

” फोडा , झोडा आणि जिंका अशी तुमची भूमिका आहे. तेव्हा तुम्हाला जर… ” ; संजय राऊतांचे थेट आव्हान

आम्ही हरियाणा जिंकलं, आता आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड तर जिंकूच. त्यानंतर आमचं टार्गेट बंगाल असेल, अस वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना केलं. मात्र त्यांच्या या दाव्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘ ते नेपाळ जिंकू शकतात, म्यानमारही जिंकतील, अगदी श्रीलंकाही जिंकतील. ज्यांच्या हातात प्रचंड पैसा आणि ईव्हीएमची सूत्र आहेत, ते कुठेही जिंकू शकतात. हरियाणा कसं जिंकल हे त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून खरं खरं सांगावं’ असं राऊत म्हणाले. ‘ तु्म्ही शिवसेना फोडलीत, राष्ट्रवादी काँग्रेसही फोडलीत. फोडा , झोडा आणि जिंका अशी तुमची भूमिका आहे. तेव्हा तुम्हाला जर खरोखर लढण्याची खुमखुमी असेल ना तर शिवसेनेचं जे चिन्ह तुम्ही तुमच्या चोरांना ( शिंदे गट) दिलं आहे, ते गोठवायला सांगा. आणि मग मैदानात या’ असं थेट आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

2026 मध्ये बंगालमध्ये आमची सत्ता येईल, अच्छे दिन येतील असं अमित शाह म्हणाले होते. त्यावरूनीही राऊतांनी त्यांना टोला हाणला. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. या देशात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होतोय, आपले जवान शहीद होतात. निरपराध नागरिक मारले जातात.संपूर्ण देशात अनागोंदी आहे. पण आपले गृहमंत्री कधी जम्मू-काश्मीर, मणिपूरबद्दल बोलत नाहीत ते फक्त राजकारणावरच बोलत राहतात. मी इकडे निवडणूक लढवेन, महाराष्ट्रात जिंकेन, तो पक्ष फोडोन, असंच ते बोलत असतात.

पण हे गृहमंत्र्यांचं काम आहे का ? सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते ना, ते काय असं वागतं होते का ? तेही गुजरातचेच होते ना ? आपण त्यांना लोहपुरूष म्हणतो ना…. अमित शाह हे त्यांचं कर्तव्य निभावत नाही. ते कधीच बंगाल काय महाराष्ट्रही जिंकू शकत नाहीत. त्यांना फक्त पक्ष फोडता येतो बाकी काही नाही, अशा शब्दात राऊतांनी त्यांना सुनावलं.

काँग्रेसला त्यांचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीतून मान्यता घ्यावी लागेल, राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात शरद पवार निर्णय घेतील. पण आम्ही असं म्हणतो की या महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा हा उद्धव ठाकरे यांचाच आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून आजही लोक त्यांच्याकडे आदराने, प्रेमानं आणि ममतेनं पाहतात. हे सांगायला मला कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

भाजप, मिंधे गट, अजित पवार या आमच्या विरोधकांनी आधी त्यांचा चेहरा कोण ते ठरवावं. मी खात्रीने सांगतो की (भविष्यात) एकनाथ शिंदे हे कोणत्याही परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री नसतील, हा निर्णय अमित शाह यांनीच घेतला आहे असा दावा राऊत यांनी केला.