kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी,रोजगार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या १० महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह रोजगाराबद्दलही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यापूर्वी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांसह महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 कलमी कार्यक्रम सादर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या १० महत्त्वाच्या घोषणा :

१) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती.
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये.
३) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
४) वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत.
५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
६) राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार.
७) ४५ हजार पांदण रस्ते बांधणार.
८) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन.
९) वीज बिलात ३० टक्के कपात.
१०) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार.

या १० कलमी कार्यक्रमासह एकनाथ शिंदेंनी पंचगंगेच्या महापुरावर तोडगा काढण्यासाठीची नवीन योजनाही जाहीर केली. “कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या पंचगंगेच्या महापूरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ३२०० कोटींची योजना सरकारने आणली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्यांऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे”, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

यावेळी एकनाथ शिंदेंनी आमचे सरकार विकास करणारे सरकार आहे, असेही सांगितले. “डबल इंजिनचे सरकार हे विकास करणारे सरकार असून राज्याचा विकास करायचा असेल तर राज्यात समविचारी सरकार असायला हवे”, असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले. “आमच्यावर दिल्लीत जातो म्हणून टीका होते, मात्र राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.