आयपीएल 2026 मध्ये 11व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नई सुपर किंग्सचा सहज पराभव केला. आरसीबीनं हा सामना एकतर्फा 43 धावांनी जिंकला. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 3 गडी गमावून 250 धावा केल्या. या हंगामातील कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सचा डाव शेवटच्या षटकात 207 धावांवर संपला. या विजयामुळं आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे, तर सीएसके तळाशी आहे.
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं चांगली सुरुवात केली. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. कोहली 18 चेंडूंमध्ये 28 धावा करुन बाद झाला. फिल सॉल्टनं शानदार फलंदाजी करत 30 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. पडिक्कलनं 29 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. पडिक्कलनं कर्णधार रजत पाटीदारसोबत तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 21 चेंडूंमध्ये 58 धावांची भागीदारी केली.
पडिक्कल बाद झाल्यानंतर टिम डेव्हिड आणि रजत पाटीदार यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी शानदार फलंदाजी करत 35 चेंडूंमध्ये नाबाद 99 धावांची भागीदारी रचली. रजतनं केवळ 19 चेंडूंचा सामना करत एक चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 48 धावा केल्या. तर दुसरीकडे, डेव्हिडनं तीन चौकार आणि आठ षटकारांसह अवघ्या 25 चेंडूंमध्ये नाबाद 70 धावा केल्या. गोलंदाजीत अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन आणि शिवम दुबे यांनी सीएसकेसाठी प्रत्येकी एक बळी घेतला.
आरसीबीनं दिलेल्या 251 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड अवघ्या सात धावांवर बाद झाला. तर संजू सॅमसन पाच चेंडूंमध्ये नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आयुष म्हात्रेही फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याने केवळ एक धाव काढली. कार्तिक शर्मानंही सलग तिसऱ्या सामन्यात निराशा केली आणि 3 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा केल्या. शिवम दुबेला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही आणि 13 चेंडूंमध्ये 18 धावा करुन तो अभिनंदन सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला.
सरफराज खाननं एका टोकाकडून शानदार फलंदाजी करत 25 चेंडूंमध्ये 50 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत सरफराजनं 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तर प्रशांत वीरनं 29 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या आणि जेमी ओव्हरटनसोबत सातव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. ओव्हरटननं 37 धावांचं योगदान दिलं. नूर अहमद 8 धावांवर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. मॅट हेन्री 2 धावांवर अभिनंदन सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. आरसीबीसाठी गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर जेकब डफी आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.












Leave a Reply