ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि इंद्रावती व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या मार्गिकेत खाणकामास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात गुरूवारी (4 जून) आदित्य ठाकरे यांनी दादरमधील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ताडोबा आणि इंद्रावती वाघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या मार्गिकेत खाणकामास त्यांनी विरोध केला. 28 एप्रिल 2026 रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी संबंधित जमीन खाण कामासाठी देण्याबाबत विचारणा केली होती. याचबरोबर, हा परिसर टायगर कॉरिडोर असल्याचं नमूद केलं होतं. मात्र 13 मे 2026 रोजी त्यांनीच दिलेल्या पत्रात हा भाग टायगर कॉरिडोर नसल्याचं नमूद केलं. अवघ्या एका महिन्यात दोन परस्पर विरोधी भूमिका कशा घेण्यात आल्या? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
याचबरोबर, महिनाभरात झालेल्या भूमिकांच्या या बदलामागे कोणाचा दबाव आहे का? याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसंच आता शहरांनंतर जंगल देखील कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. याशिवाय, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करण्याची मागणी देखील केल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील वाघ्रसंवर्धनाचा अभिमान असणाऱ्या टायगर कॉरिडोरवर खाणकामाला परवानगी दिली जात असेल, तर हा पर्यावरण आणि वन जीवनावरील मोठा आघात ठरेल,” असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच संबंधित खाण प्रकल्प तत्काळ रद्द करावा, अशी मागणी देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
देशासमोर आणि राज्यासमोर नीट परीक्षा, घसरत चाललेले रुपयाचे मूल्य, वाढती महागाई असे अनेक प्रश्न असताना सरकार मात्र आपल्या आवडत्या उद्योगपतींना लाभ मिळवून देत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. “आम्ही सत्तेत होतो, तेव्हा आम्ही आमची ताकद जनतेसाठी वापरायचो, मात्र आता हे सरकार उद्योगपतींसाठी वापरत आहे, ” असं आदित्य ठाकरे म्हणाले. याचबरोबर, विधान परिषद निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवारांनी घेतलेल्या माघारी विषयी ते म्हणाले की, “त्या सर्व लोकांची हकालपट्टी झाली आहे. मात्र सध्या महत्त्वाचा विषय हा पर्यावरणाचा आहे.”













Leave a Reply