आगामी काळात काँग्रेसच्या कोणत्याही निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये आणि पक्षपातळीवर त्याची गंभीरतेने दखल घेतली जावी या उद्देशाने आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा काढणार आहोत. त्यातून निष्ठावंतांची भावना सातत्याने पक्षाच्या श्रेष्ठींपुढे पोहोचवणार आहोत.पुण्यातून सुरू होणाऱ्या या निष्ठावंतांच्या न्याय संघर्ष यात्रेचे स्वरूप आगामी काळात शहर पातळीवरून राज्यच काय देशपातळीवर वाढेल. ज्यातून काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी एकजूट निश्चितच होईल.अशी भूमिका काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मांडली. शिवाय जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेसला निष्ठावंतांची गरज आहे, ती एकजूट या निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रेतून होणार आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंतांना विचारात न घेता सातत्याने डावलण्याचे होणारे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे. काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे आणि पक्षातील प्रत्येक निष्ठावंतांना संधी मिळालीच पाहिजे यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होऊन हजारो मेणबत्या प्रज्वलित करून मूक आंदोलन केले. त्यानंतर निष्ठावंतांच्या न्याय संघर्ष यात्रेचा शुभारंभ पुण्यातून झाला असून त्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. असेही त्यांनी जाहीर केले.

आबा बागुल यांनी म्हटले आहे की, शहर काय राज्यपातळीवर काँग्रेसच्या निष्ठावंतांना सातत्याने डावलले जाते.त्यांची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे. ‘आयाराम -गयारामा ‘साठी होणाऱ्या राजकारणात निष्ठावंतच भरडला जातो. पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्या या निष्ठवंतांच्या व्यथेची दखल घेतली जावी आणि त्यांना पक्षात संधी मिळालीच पाहिजे. तसेच पक्षाच्या निष्ठावंतांना मानसन्मानाने बोलावून त्यांची विचारपूस करून त्यांच्या भावना आणि जिथे कुठे निष्ठावंतांवर अन्याय होईल तिथे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्यावर होणारा अन्याय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय नेते राहुल गांधी, प्रदेशच्या सर्व नेत्यांसमोर प्रत्यक्ष भेट घेऊन मांडला जाईल. जेणेकरून पक्ष वाढीला चालना मिळाली पाहिजे हा हेतू या निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रेचा असून आता निष्ठेची ज्योत पेटल्याशिवाय राहणार नाही. हेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाचे काही ‘नतद्रष्ट’ पक्षाचे नुकसान करत आहेत.पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ गेली १५ वर्षे भाजपला पोषक करण्याचे कारस्थान या ‘नतद्रष्टां’नी केले आहे. वास्तविक तीन वेळा या मतदारसंघातही निष्ठावंतांवर अन्याय झालेला आहे. या ‘नतद्रष्टां’नी काँग्रेसला पोषक असणारा हा मतदारसंघ जाणीवपूर्वक भाजपला कसा फायद्याचा ठरेल यासाठीच हातभार लावलेला आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी अडथळा ठरणाऱ्यांना आताच शोधून काढले पाहिजे. नाहीतर काँग्रेस पक्ष वाढीला हा मोठा अडथळा राहील. यंदाच्या निवडणुकीवर या निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रेचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत.आमचे कार्य सुरूच राहणार आहे . मीच म्हणजे काँग्रेस अशा अविर्भावात असणाऱ्या आणि नेत्यांचे कान भरवणाऱ्या या ‘नतद्रष्टां’ना आता बाजूला केले पाहिजे. आपल्याला जातीयवादी शक्तीला रोखायचे आहे. चारशे पार काय दोनशे पार होऊ देणार नाही असा निर्धार निष्ठावंतांनी केल्याचे आबा बागुल यांनी सांगितले.

‘मीच म्हणजे काँग्रेस पक्ष’लाच आक्षेप, मग तुम्हीच उमेदवार कसा निवडून आणणार?

शहर काँग्रेसच्या एका नेत्याच्या ‘मीच म्हणजे काँग्रेस पक्ष आणि मीच खासदारकीचे तिकीट बसवले’ या वक्तव्याचे तीव्र पडसाद काँग्रेसच्या वर्तुळात उमटले आहेत. तुम्हीच म्हणजे काँग्रेस पक्ष असाल तर कार्यकर्त्यांनी काय करायचे? असा सवाल करताना ज्यांना काँग्रेस कुणाची, परंपरा काय हेच माहित नाही अशा या नेत्याला इतका अहंमपणा आला कुठून अशी संतप्त प्रतिक्रिया निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उमटली आहे. तुम्हीच म्हणजे काँग्रेस पक्ष असेल तर मग आता लोकसभेचा उमेदवार तुम्ही विना कार्यकर्ते कसा निवडून आणणार असा प्रश्नही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी माजी मंत्री श्री बाळासाहेब शिवरकर, पर्वती मतदार संघाचे निरीक्षक मुख्तार शेख, सरचिटणीस संतोष गेले, कॉंग्रेस पदाधिकारी गोरख मरल, तिळवण तेली समाज पुणे शहर अध्यक्ष घनशाम वलुंजकर, भीमज्योत संघटनेचे अध्यक्ष गजानन किरते, मुस्लिम यंग सर्कल चे महमद शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे दीपक कूडले निष्ठवंत कार्यकर्ते व पुणेकर मोठ्या संखने उपस्थित होते.