राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची निवड केली जात आहे. काही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागावाटप निश्चित करण्यात येत आहे. या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. विशेष म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत गेल्या काही दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. कारण या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर अजित पवार गटाचा दावा होता.