Breaking News

मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा

शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीनगरचे माजी खासदार आणि मविआचे विद्यमान उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज त्यांच्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. आज पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत खैरेंनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

“भाजपाने सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले. सगळं काही देऊनही एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. या सगळ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. लोकसभेची निवडणूक गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे. शिवसैनिकांना, जुन्या मतदारांना धनुष्यबाणाला मत द्यायची सवय आहे त्या सगळ्यांपर्यंत आपल्या पक्षाचं मशाल हे चिन्ह पोहचवा.” असं आवाहन चंद्रकांत खैरेंनी केलं.

“मी फक्त पाच वर्षे निवडणूक लढवणार आहे. मी २०२९ च्या निवडणुकीत उभा राहणार नाही. २०२९ ला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल. त्यामुळे अनेकांचं लक्ष माझ्याकडे आहे. मात्र विरोधक काय करत आहेत त्याकडे आमचंही लक्ष आहे. महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे, मात्र सरकारचं जनतेकडे लक्षच नाही. आमदारांकडे लक्ष द्यायलाच सरकारला वेळ आहे असाही टोला चंद्रकांत खैरेंनी लगावला. शरद पवार हे २० तारखेला सभा घेणार आहेत अशीही माहिती चंद्रकांत खैरेंनी दिली.

“आमच्याकडचे पाच ते सहा गद्दार आहेत, त्यांना आता तिकीटही मिळालं नाही. आता रडत बसले आहेत”, अशी टीका चंद्राकांत खैरे यांनी केली. दरम्यान, “काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी सुद्धा आमच्या प्रचाराला येऊ शकतात. शेतकऱ्यांचे काय हाल सुरू आहेत, महागाई वाढली आहे, या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय. आमची फाईट एमआयएमशी आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी कोणतं काम आणलं ते मला सांगा. मी १९८९ पासून या शहराला शांत ठेवलं. इम्तियाज जलील यांना अजून दिल्ली माहीत नाही. भाजप नेते भागवत कराड यांनाही दिल्ली माहीत नाही”, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला.