Breaking News

…ही आहे शरद पवारांची ताकद! ; न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

न्यूयॉर्क टाईम्स सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचल्या जाणाऱ्या अमेरिकन दैनिकाचे प्रतिनिधी बारामतीची निवडणूक कव्हर करायला येतात ही शरद पवार यांची ताकद आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एका अर्थाने ‘पवार हीच पॉवर’ असल्याचे स्पष्ट केले. शरद पवारांची ताकद काय आहे ते या निवडणुकीत बघायला मिळत आहे, असे त्या म्हणाल्या.

निवडणूक प्रचारादरम्यान माळेगाव खुर्द येथील यमाई देवी मंदिरात सुळे यांनी आज दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी उपसरपंच प्रदीप नवले राष्ट्रवादी युवा संघाचे राजेंद्र काटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक तावरे, पल्लवी काटे, पोर्णिमा पवार, अशोक जगताप अमोल कोंडे, राजेंद्र पाठक देशमुख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

बारामतीकरांनी चांगल्या वाईट प्रसंगी नेहमी पवारांना साथ दिली आहे, असे सांगत ‘माझी लढाई व्यक्तिगत नसून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘बारामती मधील विद्या प्रतिष्ठान मध्ये शिकणाऱ्या मुली आयटी कंपनीत काम करून लागल्या ही अभिमानास्पद बाब आहे. हा विकास कोणी केला, विद्या प्रतिष्ठान ही संस्था कोणी स्थापन केली, हे वेगळे सांगायची गरज नाही. देशातील ज्या तीन खासदारांचा उत्कृष्ट खासदार म्हणून सत्कार करण्यात आला त्या तीनपैकी मी एक होते, हा बहुमान माझा नाही तर बारामतीकरांचा आहे. तुम्ही संधी दिली म्हणून तो मान मला मिळाला.

केंद्र सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘आज दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, उसाला नाही, कापसाला नाही अशा प्रसंगी आम्ही लोकसभेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून बोललो, तर आम्हाला निलंबित करण्यात आलं. माझ्या आजीने आणि आईने मला मला एकच गोष्ट शिकवली आहे, ‘रडायचे नाही लढायचे’ त्यानुसार मी महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या विरोधात नेहमी लढत राहू’.