आज नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता तपोवन मैदानात मोदींची सभा होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी तंबू ठोकला आहे. लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत, हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल. शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले. जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणंच चुकीच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्याव ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती. तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजप नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी पुढे नरेंद्र मोदी कोणी नाहीत. कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गादी नाही. भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

आम्हाला अपेक्षित होतं. मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा त्या गादीची आहे. शिवाजी महाराजांचा सन्मान ती प्रेरणादायी घोषणा आम्ही देते. महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात. शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा आमची प्रचाराची घोषणा नाही तर प्रेरणास्थान आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.