२६/११ चा मुंबईवरील हल्ला आजही आपल्या सगळ्यांच्या मनात ताजा आहे. या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपले जवळचे लोक कायमचे गमावलेत. अनेक पोलीस शाहिद झाले… मुंबईने अनेक घाव स्वतःवर सोसले. पण या २६/११ च्या हल्ल्याच्या जखमा लोकसभेच्या वादळात पुन्हा वादळ निर्माण करताना दिसून येत आहेत.

राजकारणात आरोप – प्रत्यारोप, वाद -विवाद हे सातत्यानं होत असतात. लोकसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. अशातच, नवीन वाद होताना दिसून येतोय तो म्हणजे २६/११ च्या हल्ल्यावरून …

नेमकं काय झालं ?

आयपीएस हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या बंदुकीतली नव्हती. ती संघाला पाठींबा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे वास्तव उज्ज्वल निकम यांना माहीत आहे. मात्र हे प्रकरण त्यांनी न्यायालयापासून लपवलं असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

“आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान वडेट्टीवार यांनी केले. त्यानंतर पुन्हा या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले, “आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यामध्ये मी काहीही म्हटले नसून विलासराव देशमुख त्यावेळी म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत त्यांना (उज्वल निकम यांना) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा”

विजय वडेट्टीवार यांच्या मुद्द्यांवर ऍड. उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऍड. उज्ज्वल निकम यांचं उत्तर काय?

“विजय वडेट्टीवार यांनी निरधार आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटतंय. यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारे करत आहेत हे मला माहीत नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आमच्या देशाची प्रतिमा मलिन करत आहात याचं आश्चर्य वाटतं”, असं उज्ज्वल निकम म्हणाले. “असे आरोप करून विरोधी पक्षनेते २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अनादर करत आहेत. ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत”, असेही उज्ज्वल निकम म्हणाले.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणी आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांचं म्हणणं काय ?

हेमंत करकरे हे आपले पोलीस अधिकारी देशासाठी लढताना शहीद झाले आहेत. कसाब आणि त्याची टोळी जेव्हा मुंबईत घुसली तेव्हा हेमंत करकरे त्यांचा सामना करत होते. त्यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला की आणखी कुठल्या गोळीने झाला हा भाग आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. पण करकरे हे देशासाठी शहीद झाले तेव्हा ते एटीएसचे प्रमुख होते. हेमंत करकरेंच्या मृत्यूबाबत काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती. पण मला विचाराल तर मला असं वाटत नाही. कारण इतर पोलीस अधिकारीही या हल्ल्यात शहीद झाले. आता करकरेंबाबत विजय वडेट्टीवार यांनी काही पहिल्यांदा वक्तव्य केलेलं नाही.

आरएसएस आणि करकरे यांच्यात संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर चर्चा झाल्या. एटीएसने त्यावेळी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. रमेश उपाध्याय यांनाही अटक केली होती. त्या केसचा अभ्यास मी केला आहे. त्यावेळी आरएसएसचे लोक माझ्याकडे यायचे, करकरेंनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे असं सांगायचे. कर्नल पुरोहित यांचे कुटुंबीय माझ्याकडे यायचे. आरएएस आणि करकरेंचा संघर्ष सुरु होता. दुसरी गोष्ट की विजय वडेट्टीवार यांचं नाव का घेता? हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा, ते हसन मुश्रीफ यांचे भाऊ एस एम मुश्रीफ यांनी लिहिलं आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारायचा असेल तर मुश्रीफ यांना विचारा. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा हे आरएसएसचे लाडके होते. त्यांना अटक झाल्याने संघ आणि हेमंत करकरेंमध्ये संघर्ष सुरु होता. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

यामुळे, लोकसभेच्या निवडणुकीच्या वातावरणात २६/११ चा मुद्दा नवीन वळण घेणार का , हा लोकसभेसाठी नवीन मुद्दा ठरतोय का , या विषयावर आत्ता बोलणे योग्य आहे का असे प्रश्न आता सामाजिक वर्तुळात चर्चिले जात आहेत.