kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मला सुनेत्रा पवारांची दया येते, अजितदादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवलंय: संजय राऊत

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार आहे. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांचे पतीराज अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बळीचा बकरा बनवले आहे, अशी टिप्पणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या अनुषंगाने भाष्य केले.

बारामतीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाचा पराभव करुन मोदी आणि शाहांना दाखवून द्यायचं आहे की, आम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांनी पैशाच्या ताकदीवर आणि तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला. पण तसं होणार नाही. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. या लढाईत सुप्रिया सुळे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात भाजप दारुण पराभवाच्या छायेत आहे. भाजपचे अनेक विद्यमान खासदार पुन्हा लोकसभेत दिसणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.

नारायण राणे हे पराभवाचा चौकार मारतील. आम्ही आधी मुंबई आणि कोकणात त्यांचा पराभव केला. आता ते मोठ्या लढाईत उतरले आहेत. मात्र, विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये विजयी होतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक प्रचारसभा घेतल्या आहेत, आता ते मुंबईत येत आहेत, याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर राऊतांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी पेडर रोडला आणि अमित शाह यांनी बोरिवलीत घर भाड्याने घेतले आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्यांना इथेच राहायचे आहे, त्यांना दुसरं काय काम आहे. पण तुम्ही कितीही खुंट्या ठोका, शिवसेना तुमचा पराभव करेल. मोदींना मुंबईत येऊ द्या. तरीही मुंबईत ठाकरे गटच जास्त जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा एक खोटारडा माणूस आहे. जो माणूस आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसत असतो, त्यांच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवता? हे डरपोक लोक आहेत , घाबरून पळालेले लोक आहेत. नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेनचं युद्ध थांबवलं, ही अंधश्रद्धा एकनाथ शिंदेंनी पसरवली आहे, असे राऊत यांनी म्हटले.