kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिर्डी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा व्हिडीओ ठरला राज्यासाठी मार्गदर्शक!

राज्यातील लोकसभा निवडणुका पाच टप्प्यांत होत आहेत. आतापर्यंत राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या आहेत. यात १३ मे व २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजे ३ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक प्रशिक्षणाची माहिती देणारा १ तास ४८ मिनिटांचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला. या व्हिडीओत स्वत: बाळासाहेब कोळेकर व वर्धा उपजिल्हाधिकारी सायली सोळंके-वमने यांनी निवेदन केले आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या व्हिडीओत प्रास्ताविक केले आहे.

मतदान यंत्र व मतदान कार्यपद्धती याविषयी प्रशिक्षण देणारा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनविलेला व्हिडीओ राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला आहे. ‘आरओ शिर्डी’ या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला निवडणूक प्रशिक्षणाची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडीओ आजपर्यंत १ लाख ३८ हजार प्रेक्षकांनी पाहिला आहे.

निवडणूक प्रशिक्षणाविषयी मराठी भाषेत साध्या-सोप्या, तसेच नाट्य रूपांतराच्या माध्यमातून माहिती देणाऱ्या व्हिडीओची समाजमाध्यमांवर कमतरता होती. निवडणूक प्रशिक्षणाविषयी माहिती देणारे बहुतांश व्हिडीओ इंग्रजी व हिंदी भाषेत आहेत. शिर्डी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने बनविलेला व्हिडीओ मराठीत असल्याने निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या व्हिडीओला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओत मतदान यंत्रांची तोंडओळख, यंत्राची जोडणी, मतदान करण्याची पद्धत, मॉकपोलपूर्वीची तयारी, मतदान केंद्रावरील बैठक व्यवस्था, मॉकपोलची कार्यपद्धती, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटची मूलभूत माहिती, मतदान यंत्र सीलबंद करण्याची प्रक्रिया, मतदान केंद्रातील मतदानाची कार्यपद्धती व मतदान अधिकाऱ्यांची कामे, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतदानाची वेळ समाप्त होण्यापूर्वी चिठ्ठ्या वाटपाची कार्यवाही, मतदान समाप्तीनंतर मतदान यंत्र, ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मोहोरबंद करण्याची पद्धत व महत्त्वाचे फॉर्म्स, ईडीसीद्वारे मतदान आदी प्रक्रियेविषयी माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे.

या व्हिडीओत काही सुधारणांसह चार दिवसापूर्वी नवीन व्हिडीओ ‘आरओ शिर्डी’ या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून अल्पकाळात साडेतीन हजार प्रेक्षकांनी भेट दिली आहे.