विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण देत गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजातील घरे, दुकानांची फोडाफोडी, दगडफेक व नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. या प्रकाराला संभाजीराजे छत्रपती जबाबदार असून त्यांना ताबडतोब अटक करावी, पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे पोलीस अधीक्षकांची बदली करावी व जातीय दंगली घडविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मोहामेडन एज्युकेशन सोसायटी म्हणजे मुस्लीम बोर्डीगने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.

चेअरमन गणी आजरेकर व प्रशासक कादर मलबारी यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. याठिकाणी व हिंदू व मुस्लिमांचे अतिक्रमण असताना केवळ मुस्लिम समाजावर अत्याचार केले गेले. घरांवर-प्रार्थनास्थळांवर दगडफेक, तोडफोड, महिला व लहान मुलांवर अत्याचार केले गेले हे पुरोगामी कोल्हापूरला न शोभणारे आहे. या समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व याचे सुत्रधार पुण्याचा रविंद्र पडवळ यांच्याकडून नियोजनपूर्वक यासाठी रसद पुरवली गेली.

जमावबंदी असताना मोर्चा निघालाच कसा, अतिक्रमणविरोधी मोर्चा असताना हल्ला का केला गेला, गजापूरमध्ये कोणताही विषय नसताना तेथील मुस्लिम समाजावर अत्याचार का केले गेले. पोलीसांना मारहाण, पत्रकारांना धमकावण्याचा प्रकार झाले. विशाळगडावर जाण्यासाठी एकच रस्ता आहे, तेथे पोलीसांनी समाजकंटकांना हत्यारासह सोडले, नागरिकांना सुरक्षा न देता बघ्याची भूमिका घेतली.

तरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर कडक कलमे लाऊन सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर हल्ला, महिलांचे विनयभंग, घरफोडी, लुटालुट,, प्रार्थनास्थळावर दगडफेक, धार्मिक ग्रंथ पेटविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदाेलन व विराट मुक मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शकिल अत्तार, रफिक मुल्ला, अब्दुलरहिम बागवान, गुलाब मुजावर, हुसेन मुजावर, सरफराज जमादार, जाफर मुजावर. अहमद मुजावर. सलीम अत्तार यांच्यासह मुस्लीम बांधव माेठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान सांगलीतील एमआयएम संघटनेच्यावतीनेदेखील डॉ. महेश कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानेही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. त्यामुळे हिंदुत्ववादी नेत्यांच्या विशाळगडाबाबतच्या प्रतिक्रियांवर निर्बंध घालावेत. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली. यावेळी सुफियान पठाणे, सद्दाम सय्यद, साहिल देशनूर, सिकंदर जमादार, सैफअली शेख, सुफीयान पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.