राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा धारकांना ८आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादषीनिमित्त उद्या (१७ जुलै) पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत. या पूजेसाठी ते आज संध्याकाळीच पंढरपुरात दाखल झाले. दरम्यान, संध्याकाळी त्यांनी पंढरपुरात आयोजित ‘कृषी पंढरी’ या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. दरम्यान, शिंदे यांनी पंढरपुरातून लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्याची घोषणा केली.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांबरोबर यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी तरुणांसाठीच्या योजनेची घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कामगारांचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहतंय. आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये दिले जातील. तसेच त्यांना दर वर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील.