पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली आहे. शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे ठाकरे गटात चिंता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांनी काल (3 ऑगस्ट) आणि 22 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. गेल्या 10 दिवसांत शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात दोन वेळा झालेल्या भेटी या ठाकरे गटात आश्चर्य वजा चिंतेचा विषय असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सलग झालेल्या दोन भेटी या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिटमस टेस्ट असल्याचं विश्लेषण ठाकरे गटात केलं जात आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समुहाला देण्यास उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांची महाविकास आघाडीत भूमिका स्पष्ट आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर रद्द करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसची देखील काही वेगळी भूमिका नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या मैत्रीवर टीका केली आहे. असं असताना शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मैत्रीपूर्व संबंध हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली का? याची माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसकडून घेतली जात आहे.
दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केले जात आहेत का? याची देखील माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसकडून घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका पार पडत आहेत. दुसरीकडे शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचं राजकारण करत आहे का? असा देखील चर्चेचा सूर राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं आणखी एक विश्लेषण केलं जात आहे. राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचं सरकार निवडून येणं शक्य नाही किंवा तसं घडणं खूप कठीण आहे. अशा काळात निवडणुकीच्या निकालानंतर वेगळं काही समीकरण आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकतं का? त्यासाठी शरद पवार यांची साखर पेरणी सुरु आहे का? अशी चर्चा सुरु आहे. भले शरद पवार हे साखर कारखान्यांचा मुद्दा, दूध उत्पादक संघाचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा मुद्द्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होत आहे. त्यामुळे या बैठकीमुळे ठाकरे गटात चर्चा सुरु आहे.