ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील वीर गावचे श्रीक्षेत्र श्रीनाथ म्हस्कोबा आणि गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे साडेसहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचा यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून निधी मंजूर केल्याबद्दल सुळे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

पुरंदर तालुक्यातील या दोन्ही दरवस्थांनाना ‘ब’ दर्जा प्राप्त आहे. जेजुरी येथील खंडेरायाप्रमाणेच वीर आणि ज्योतिर्लिंग या ठिकाणी दोन्ही राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. याठिकाणी होणाऱ्या यात्राही मोठ्या प्रसिद्ध आहेत. या दोन्ही देवस्थानचा विकास करण्यात यावा, भाविकांसाठी भक्त निवास, उत्तम प्रतीचे रस्ते, वाहतूक व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वछतागृह, शौचालय आणि मंदिराभोवती संरक्षक भिंत आदी सुविधा मिळाव्यात, खासदार सुळे आणि संजय जगताप हे सातत्याने करत होते. या मागणीला अपेक्षीत यश आले असून शासनाने निधी मंजूर केला आहे.

शासनाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत वीर येथील म्हास्कोबा देवस्थानच्या विकासकामांसाठी २ कोटी ७५ लाख ९७ हजार तर गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विकासकामांसाठी ३ कोटी ७१ लाख ६१ हजार असा सुमारे साडेसहा कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भक्त निवास, संरक्षक भिंत, शौचालय, पथदिवे आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. हा निधी मंजूर केल्याबद्दल खासदार सुळे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.