“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते, शब्द देताना एक वेळा नव्हे तर शंभर वेळा विचार करा. आम्ही त्यांच्या विचारांवर चालतो. त्यानुसार आम्ही ही योजना आणताना शंभर वेळा विचार केला. त्यामुळेच सांगतो, ही योजना बंद होणार नाही,” अशी आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. ‘टीव्ही ९ मराठी’च्या महाराष्ट्राच्या महासंकल्प कार्यक्रमात ते बोलत होते. ‘टीव्ही ९ मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत आणि निखिला म्हात्रे यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लाडकी बहीण योजनेत आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही. विरोधक या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. ते या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. परंतु ही योजना कधीच बंद होणार नाही. लोक विरोधकांना जागा दाखवतील.
निवडणुकीचा चेहरा तुम्ही आहात पण मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा तुम्ही नाही? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, मी सामान्य कार्यकर्त्यांपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलो आहे. यापूर्वी यश मिळाले तेव्हा त्याचे श्रेय सहकाऱ्यांना दिले, कार्यकर्त्यांना दिले. अपयश आले तेव्हा जबाबदारी मी घेतली. श्रेयवादाच्या वादात मी पडणार नाही. मला काही वाटण्यापेक्षा जनतेला वाटले पाहिजे.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते. अजित पवार यांनी अनेकवेळा मुख्यमंत्रीपदाचा मानस व्यक्त होईल. परंतु एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. तुम्ही नशिबवान नाही का? यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नुसते नशीब नको आहे. त्याला कष्टाची जोड हवी. फिल्डवर उतरावे लागते. फेसबुक लाईव्हवरुन काहीच होत नाही.
विरोधक फक्त राजकारण करत आहे. विरोधकांनी राजकारण करावे. परंतु राजकारण करताना कोणत्या पातळीवर जावे, त्याचे विचार करायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विषयात त्यांनी राजकारण करण्याऐवजी सूचना केल्या असता तर अधिक चांगले झाले असते. परंतु त्यांची पायाखालची जमीन सरकली आहे.