काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी आज (११ सप्टेंबर) अनंतनाग येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “लोकसभेला आमच्या अजून २० जागा आल्या असत्या तर हे सगळे तुरुंगात असते (आमचे अजून २० उमेदवार निवडून आले असते तर भाजपावाले तुरुंगात असते). ४०० पारच्या घोषणा देणारे लोक अवघ्या २४० जागांवर अडकले. मात्र आमच्या अजून थोड्या जागा यायला हव्या होत्या. तसं झालं असतं तर आताची राजकीय समीकरणं वेगळी असती”.

खर्गे म्हणाले, “आम्ही अजून २० जागा जिंकल्या असत्या तर हे सगळे लोक आज तुरुंगात असते. ते लोक केवळ तुरुंगात राहण्यालायक आहेत. भारतीय जनता पार्टीचे लोक केवळ मोठमोठी भाषणं करतात, पण त्याच भाषणांमध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण करणं त्यांना जमत नाही. भाषण करणं आणि कृती करणं यात खूप फरक आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सची युती त्यांना तोडता येणार नाही. आम्ही व आमची युती कमजोर होणार नाही. संसदेत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. आता विधानसभेत त्यांना इंगा दाखवायची वेळ आली आहे. आमची एकजूट झाली आहे, पर्ण ताकदीनिशी आम्ही जम्मू काश्मीरच्या विधानसभेत परतू.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सची युती पाहून भारतीय जनता पार्टी घाबरली आहे. त्यामुळेच ते जम्मू-काश्मीरमधील उमेदवारांची यादी वारंवार बदलत आहेत. कोणत्या जागेवर कुठला उमेदवार उभा करावा हे त्यांना सुचेनासं झालं आहे. त्यांचा पक्ष या राज्यात कमकुवत आहे. भाजपाच्या गोटातील बातम्या वाचून तुम्हाला अंदाज आलाच असेल की इंडिया आघाडीची एकजूट पाहून हे भाजपावाले किती घाबरले आहेत. राहुल गांधी व फारुख अब्दुल्ला एकत्र आल्याने भाजपाच्या गोटात शांतता पसरली आहे.

भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये ५ लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. खर्गे यांनी याला भाजपाची जुमलेबाजी म्हटलं आहे. ते म्हणाले, भाजपाने दर वर्षी देशात २ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन भाजपावाले पूर्ण करू शकले का? उलट देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. १० वर्षे उलटली तरी हे लोक एक लाख तरुणांची भरती करू शकले नाहीत ते लोक आता पाच लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन देतायत, हे पाहून त्यांची कीव कराविशी वाटते.