जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले व हरयाणात काँग्रेसला अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणामध्ये काँग्रेसचा अनुकूल वातावारण असताना सत्ता हातातून येता-येता निसटली. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार असले तरी काँग्रेसला येथे दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. २०१४ च्या तुलनेत येथे काँग्रेसच्या जागा निम्म्यावर आल्या आहेत. त्यातच काँग्रेसला आणखी दोन धक्के बसले आहेत. आदमी पार्टीने दिल्लीतील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर उमेदवार दिले आहेत.

हरयाणातील दारुण पराभवानंतर मित्रपक्ष काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक एकट्याने लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेससोबत युती होणार नसल्याचे म्हटले आहे. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी बुधवारी सांगितले की, आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कक्कड म्हणाल्या की, आम्ही दिल्ली विधानसभा निवडणूक एकट्याने लढवणार आहोत. एका बाजूला अतिआत्मविश्वासी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला अहंकारी भाजप आहे. गेल्या १० वर्षांत केलेली आमची कामांच्या बळावर आम्ही मते मागू. दिल्लीत २०२५ च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी ६२ आणि भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या.

कक्कड यांच्या वक्तव्यामुळे ‘आप’ आणि काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्र लढवू शकतात, असे मानले जात असलेल्या सर्व शक्यता मावळल्या आहेत. आता दिल्लीत काँग्रेसला भाजप आणि ‘आप’ला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. २०१३ पासून काँग्रेसचा एकही नेता दिल्ली विधानसभेत पोहोचलेला नसल्याने ही घोषणा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे, असे मानले जात आहे.

‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, हरयाणा निवडणुकीच्या निकालातून सर्वात मोठी शिकवण म्हणजे कधीही अतिआत्मविश्वास बाळगू नका. पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील दहा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या जागांवर काँग्रेसने दावा केला होता. नावांची यादी पाहिली तर अखिलेश यादव यांनी नेत्यांच्या कुटुंबियांवर अधिक विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट होते. सहापैकी पाच जागांवर नेत्यांच्या मुलगा-मुलगी, पत्नी आणि नातेवाईकांना तिकीट देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *