महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामध्ये पुणे व ठाणे जिल्हा या ठिकाणी वारंवार एका मागून एक अशा घटना घडत आहेत. नुकताच बदलापूर येथे अक्षय शिंदे या आरोपीकडून चिमुकल्या मुलीवर केलेल्या अत्याचाराचा संपूर्ण देशाने निषेध केला आहे. अशी ताजी घटना घडलेली असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात त्यांच्याच पक्षातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने भंडारआळी येथील ११ वर्षाच्या चिमूरड्या मुलीवर विनयभंग केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. अशा आरोपीला जामीन कसा मंजूर होऊ शकतो यावर प्रश्नचिन्ह पडले असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आज ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
काय आहे निवेदनात ?
यामध्ये या आरोपीला सोडण्यासाठी जर राजकीय हस्तक्षेप होत असेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे. तसेच या आरोपीवर पोक्सो अंतर्गत अधिकाधिक कठोर गुन्हा दाखल करून त्याला पुन्हा अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, समिधा मोहिते, आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, मंजिरी ढमाले, संगीता साळवी, कांता पाटील, सुप्रिया गावकर, सुनंदा देशपांडे ,नंदा कडकोळ, रजनी बंका, हेमांगी पांचाळ, सचिन चव्हाण, संजय भोई, राकेश जाधव, आनंद मानकामे, वरून मानकामे, अजय पवार, बिपिन गेहलोत तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.