विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारपासून (२२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच अनेक नेते एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांना एबी फॉर्मही दिले जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादीही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

अशातच ऐन निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. महंत सुनील महाराज यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देताना आपली खंतही बोलून दाखवली. गेल्या १० महिन्यांत १० मिनिटेही उद्धव ठाकरेंचा वेळ मिळाला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे वेळ देत नसल्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुनील महाराज यांनी सांगितलं.

सुनील महाराज काय म्हणाले?

“मी अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला, मेसेजही केले. पक्ष वाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी मला तुम्हाला भेटायचे आहे. उद्धव ठाकरे यांचे पीए रवी म्हात्रे यांनाही अनेकवेळा संपर्क केला. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली. मात्र, गेल्या जवळपास १० ते १२ महिन्यांपासून मला त्यांच्या भेटीचा साधा १० मिनिटेही वेळ मिळाला नाही. मग आपण भेटीची वेळ मागून जर भेट मिळत नसेल, आपली दखल घेतली जात नसेल पक्षाला आपली गरज नाही हे यामधून सिद्ध होतं”, असं सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वर्षभरापूर्वी ‘मातोश्री’वर जाऊन पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले होते. मात्र, आता सुनील महाराज यांनी आपल्याला पक्षाकडून पक्ष प्रमुखांशी भेटण्याची वेळ मिळत नसेल तर माझी आपल्या पक्षाला काही गरज नाही, असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्रही लिहिलं आहे. या पत्रात आपण मोठ्या जड अंत:करणाने शिवसेना (ठाकरे) पक्षाचा राजीनामा पत्राद्वारे देत असल्याचं महंत सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *