एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील तुरुंगांमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासंदर्भात केलेला दावा खोटा ठरला तर राजकारण सोडेन, असेही नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले. मुख्यमंत्री भगवंत मान हे तुरुंग मंत्रीही आहेत. त्यांनी काय केले? असा सवाल करत नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, “कारागृहात अमली पदार्थांच्या गोळ्या विकल्या जात आहेत. माझे म्हणणे खोटे ठरले तर मी राजकारण सोडेन”.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, ड्रग्ज माफिया आणि तुरुंग यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. उच्च न्यायालयानेही याबाबत आठवडाभरात धोरण तयार करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दोन्ही राज्यांमध्ये व्यसनाधीन लोकांच्या तपशिलांचा स्टेट्स रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धू यांनी तुरुंगात अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील वाढते कर्ज आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही पंजाब सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार केंद्राचा निधी विहित कामांसाठी वापरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पंजाबसाठी 8,000 कोटी रुपयांचा निधी रोखला होता. केंद्राच्या योजनेतील 40 टक्के वाटा देण्यासाठीही राज्य सरकारकडे पैसे नाहीत, असे नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले. दरम्यान,1988 च्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांना 10 महिने तुरुंगवास भोगावा लागला. या घटनेत पटियाला येथील रहिवासी गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला होता. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांची तुरुंगवासाची मुदत संपण्यापूर्वीच त्यांची सुटका झाली.