Breaking News

मनसेच्या एकमेव आमदाराचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, म्हणाले ….

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज डोंबविलीत विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा पार पडली. मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची ही सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. त्याचबरोबर राजू पाटील यांनी देखील एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “वाहतूक कोंडीमुळे या परिसरातील रहिवाशांची मी माफी मागतो. आमच्या सभेमुळे त्यांना त्रास झाला. निवडणूक आल्याने सभा होतात. मात्र इथल्या राज्यकर्त्यांनी सभा होतील, असे मैदान बनवले नाहीत. जे आहे ते बिल्डरांच्या घशात टाकलेले आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी सभा घेतलेली आहे. मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार. यांनीही या ठिकाणी उमेदवार दिला आहे”, असं राजू पाटील म्हणाले.

“मला सर्व सांगत होते, इकडे उमेदवार देणार की नाही? मात्र देवाशपथ मला त्यांचे उपकार नकोच होते. या लोकांनी मला पाच वर्षे त्रास दिला. यासाठी त्यांचे उपकार मला नको. मला 2019 च्या निवडणुकीवेळी या लोकांनी त्रास दिला. महाराष्ट्रात राजकीय संस्कृती खराब होत चाललेली आहे. त्याची सुरुवात इथून झालेली आहे. याच रागाच्या कारणाने मी बोलतोय”, असं राजू पाटील म्हणाले.

“दिशा कायद्यासारखा कायदा महाराष्ट्रात यावा याची पहिली मागणी मी केली आहे. याचा मला अभिमान आहे. मात्र तो केंद्र सरकारकडे बाकी आहे. त्या लोकांनी रेशनिंगचे तांदूळ लोकांना वाटले आम्ही स्वखर्चाने रेशन वाटलेलं आहे. जे आम्हाला बोलतात घरी बसलेले, त्यांना मी सांगतो, मी घरी बसलो नाही. आम्हाला तीन-तीन कोरोना झाला”, असं राजू पाटील म्हणाले.

“या भागात टोरेंट टायगर डम्पिंग प्रकरण त्यांनी आणलं. सुभाष भोईर यांनी केलेली कामे मला निस्तरावी लागली. मी 27 गाव, टोरंटचं आंदोलन केलं. मात्र तिथे हे बाप-बेटे, दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे आडवे आले. मूळ मागणी 27 गावांची होती. मात्र 18 गावे यांनी बाहेर काढली. एक मनसेचा आमदार निवडून आला. त्यांनी पूर्ण भागाचा बट्ट्याबोळ केला. या लोकांनी अनेकवेळा मला त्रास दिला. मात्र मी कधी घाबरलो नाही”, असं राजू पाटील म्हणाले.

“राज ठाकरे बोललेले सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. सक्षम विरोधी पक्ष राहून कशी कामे आणू शकतो हे मी या मतदारसंघात दाखवतो. बरीचशी कामे आम्ही दिलेली आहेत. ती ओव्हरलॅप करून आमचा बबड्या स्वतःचं लेटर देऊन सांगतो, ही कामे बाबा आमच्या नावावर टाकून द्या. आम्हाला काम होण्याशी मतलब. पाट्या तुम्ही लावा नाहीतर काही करा. मात्र ही कामे आमच्या विरोधामुळे आलेली आहेत”, अशा शब्दांत राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

“ही लोकं कुठल्याही थराला जातात. आज राजकारण सगळे बघत आहेत. ते काही आरोप करून माझ्या सहकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. या आम्ही तयार आहोत. आम्ही घाबरत नाही. मला बघायचंच आहे? काय करतात. राज ठाकरे यांना बोलणारच आहे की साहेब बरं झालं यांच्यामागे आपण लागलो. पाच वर्ष माझ्या सहकाऱ्यांना जो त्रास दिलाय त्याचा वचपा मला काढायचा आहे. घाणीचं राजकारण यांनी केले. आमच्या भागातलं राजकारण या बाप-बेटांनी बिघडवलेला आहे किंवा त्याचे इतर सहकारी असो यांनी यांचा स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी इथे राजकारण केलेलं आहे आणि हे राजकारण आम्हाला संपायचं आहे”, असा दावा राजू पाटील यांनी केला.

“लोकसभेला यांचा प्रचार करताना आम्हाला खूप अडचण झाली. मात्र राज ठाकरेंच्या आदेशामुळे आम्ही त्यांचे शब्द खरे करून दाखवले. मला माहीत होतं ही लोकं काम करणार नाहीत. माझे सहकारी बोलायचे की तुम्हाला सीट सोडणार नाही. मला श्रीकांत शिंदे यांनी शब्द दिला होता, तुम्ही मला मदत करा. तुमच्या गावांसाठी मी बाबांकडून निधी आणून देईन. त्याप्रमाणे मी 69 कोटींचं पत्र यांना दिलं. ती कामं चार महिन्यांपूर्वी हळूहळू करत यांनी मला नकार दिला. त्यावेळेला मला कळालं याच्या दानतमध्ये खोट आहे. आम्ही कोत्या मनाचे नाहीत. माझं शाश्वत काम करण्यामध्ये विश्वास आहे. या ठिकाणच्या महिलांसाठी अमृत योजनेचं काम करण्याच्या पाठी लागलेलो आहे”, असं राजू पाटील म्हणाले.

“मला मतदान करा किंवा नाही मात्र मी गेलो तर हे पाणी चोरणारे आहेत. आमदार असो किंवा पाणी असो हे चोरणार. त्यामुळे मी व्यवस्थित लक्ष ठेवून यांच्याकडे आहे. माझे खूप प्रश्न आहेत. मुख्यमंत्री यांनीही त्याचे उत्तरे द्यावी. पलावा पूल अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी आडवातीडवा उभा केला. आमच्या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे यांनी अनेक सभेमध्ये या ठिकाणी द्यावे”, असं चॅलेंज राजू पाटील यांनी दिलं.