Breaking News

दौंडकरांनी आम्हाला आमदार द्यावा, मी तुम्हाला मंत्रिपद देतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुल कुल अभ्यासू आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा माणूस आहे. राहुल कुल यावेळेस रेकॉर्ड करणार आहेत. दौंडकरांनी मला आमदार द्यावा, मी तुम्हाला मंत्रिपद देतो, असे सांगत कुल यांना २० हजारांच्यावर निवडून दिल्यास कॅबिनेट तर २० हजारांच्या आत निवडून दिल्यास राज्यमंत्री केले जाईल. याचा विचार मतदारांनी करावा. कारण हे आता तुमच्या हातात आहे. आम्ही राहुल कुल यांना मंत्री करायचे ठरवले असून, कुल यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी आमदार रंजना कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे, कांचन कुल, आनंद थोरात, गुरुमुख नारंग, हरिश्चंद्र ठोंबरे, स्वप्निल शहा, महायुतीची नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, भीमा-पाटस कारखाना सुरू करण्यासाठी सातत्याने राहुल कुल माझ्याकडे पाठपुरावा करीत होते. इतका पाठपुरावा करीत होते की माझ्या डोक्यावरचे केस या भीमा-पाटसमुळे गळून गेले. भीमा-पाटस कारखान्याच्या मदतीसाठी कर्नाटकातील माजी मंत्री निराणी धावून आले. त्यामुळे कारखाना सुरू झाला. परंतु हा कारखाना भविष्यात जिल्ह्यातील मोठा कारखाना राहील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. राहुल कुल यांनी पाणी प्रश्नावर मोठा अभ्यास केलेला आहे. मुळशी धरणाचे पाणी आणण्यासाठी तसेच खडकवासला ते फुरसुंगी टनेल या प्रकल्पासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. परिणामी दौंड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्या हातून मार्गी लागणार आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यावर चांगले काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार योगेश टिळेकर, वासुदेव काळे, वैशाली नागवडे, महेश भागवत, नंदू पवार, नरेश डाळिंबे,ॲड. बापूसाहेब भागवत, दादासाहेब केसकर, जयश्री दिवेकर, दौलत शितोळे, लवंगरे महाराज, अमित सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

गेल्या दहा वर्षांत तालुक्यात सर्वांगीण विकास केला. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जात-पात, धर्म याचबरोबरीने कुणाचे आडनाव पाहिले नाही. विरोधकांच्या मदतीला तर सर्वात प्रथम धावून गेलो. विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या रिंगणात आहे. याकामी जनतेने मला साथ द्यावी. दौंड तालुक्यात औद्योगिक वसाहत, शिक्षण संकुल यासह अन्य काही प्रकल्प उभे राहिले पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस निश्चितच मदत करतील. कारण विकास हाच केंद्रबिंदू समजून कामकाज करीत आहे, असा विश्वास राहुल कुल यांनी व्यक्त केला. माझ्यावर वारंवार चुकीचे आरोप केले जातात. मात्र या आरोपांचे खंडन मात्र माझ्या विकास कामातून केले जाते आणि याला साथ मिळते ती जनतेची. म्हणूनच जनतेच्या पाठबळावर गेली दहा वर्षे आमदार आहे आणि या निवडणुकीत देखील विजय होणार आहे, असे राहुल कुल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *