सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी आज महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी आज रात्री उशिरा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी दिल्लीत दाखल झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.
या सर्व घडामोडी सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारी घटना घडताना दिसली. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकीकडे बैठक सुरु असताना रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळाहून थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दाखल झाले होते. नड्डा आणि शाह यांच्यात बैठक सुरु होती. या दरम्यान एकनाथ शिंदे तिथे पोहोचले. यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकत्र बैठक होणार असल्याची माहिती आहे.