महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकांना मोठी आश्वासनं दिलं होती. महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना राबवत 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार, असं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, महाविकास आघाडीच्या या आश्वासनाना काऊंटर करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली होती. आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना देण्यात येणारा हप्ता 1500 वरुन 2100 करु , असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. दरम्यान, याबाबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.
असा कोणीही तर्क काढला नाही. मला मुलाखतीत विचारलं, 2100 रुपये कधी वाढणार. मी त्यांना म्हटलं, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. बजेटमध्ये वाढवायचं, रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. पुढच्या वर्षात निश्चितपणे वाढेल, इतकीच प्रतिक्रिया मी दिली. पण काही लोकांनी त्याचा विपर्यास केला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये करण्याचे आश्वासन भाजपच्या संकल्पपत्रात आहे. पैसे वाढवले नाहीत तर मी स्वत: पत्र लिहेन. मी आग्रह करेन, हे पैसे दिले पाहिजे. हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकल रीत सदा चले आये, प्राण जाये पर वचन न जाए, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
लाडक्या बहिणींना 3000 देण्यात यावे, अंबादास दानवे यांची मागणी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे म्हणाले, आमची मागणी आहे की, लाडकी बहीण योजनचे पैसे 3000 केले पाहिजेत. तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे. आधीतरी कमी आमदार होते. आता तुमचे त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत. 3000 रुपये लाडक्या बहीणींना दिले पाहिजेत. पुढची भाऊबीज वगैरे या सर्व गोष्टी खोट्या होतील, ही फसवणूक होईल. लोक म्हणतील हा निवडणुकीसाठी केलेला जुमला होता का? तुमच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये होते, आमचं मत आहे की, 3000 रुपये द्यावेत.. नवे सरकार आल्यापासून लाडकी बहीणच्या पैशांमध्ये वाढ केली पाहिजे.