विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर महायुतीचा थपथविधी सोहळा आज (५ डिसेंबर) पार पडाला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदान येथे हा भव्य सोहळा पार पडाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. राजकीय क्षेत्राबरोबरच क्रीडा, चित्रपट आणि उद्योग जगतातील अनेक मान्यवर देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
इकडे देवंद्र फडणवीस यांनी तिसर्यांचा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहेत. सोशल मिडियावरदेखील सगळीकडे फडणवीस यांच्याच नावाची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ‘देवेंद्र फडणवीस’ (#DevendraFadnavis) याबरोबरच ‘तो पुन्हा आला’ (#ToPunhaAala) हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागल्याचे पाहायला मिळाले. या हॅशटॅग वापरून वापरकर्ते मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस यांचे जुने फोट आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट करत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणाले होते. यावरून फडणवीस यांना बरेच ट्रोल करण्यात आले. आता ते खरोखर पुन्हा आले आहेत. याच पार्श्वभूमीवर देंवेंद्र फडणीस यांच्या चाहत्यांकडून ‘तो पुन्हा आला’ असा हॅशटॅग वापरून पोस्ट केल्या जात आहेत.