राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किरीट सोमय्या यांचे आरोप झिडकारले असून, आता सोमय्या यांच्या अक्कलेची तिजोरी फोडायची वेळ आली आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी दिली. सोमय्या यांनी तातडीने आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतील, असा गंभीर इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांना सध्या भाजपमध्ये चहापानाचाही मान उरलेला नाही. प्रसिद्धीसाठी हपापलेल्या किरकिऱ्याचा कर्णकर्कश आवाज आपण सर्वांनीच एका खासगी वृत्तवाहिनीवर पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावरील ‘ते’ वेदनादायी हावभाव आठवले की अजूनही भाजपनेच त्यांची क्लिप बाहेर काढली या मतप्रवाहावर विश्वास बसतो, असे सांगत ॲड.अमोल मातेले यांनी भाजपच्या पक्षाअंतर्गत फुटीरतावादी राजकारणावर शाब्दिक हल्ला केला. गेल्यावेळी सोमैया यांना भाजपकडून खासदारकीचे तिकीट नाकारले गेले. तेव्हापासून आपला एकांत घालवण्यासाठी किरकिऱ्याला आता ‘जवानी दिवानी’ करण्यात वेळ घालवावासा वाटतोय. किरकिऱ्या भाजप पक्षात आलेल्या ‘मिंदे’ आणि ‘चेंदे मेंदे’ सरकारचे आर्थिक घोटाळे पक्षप्रवेश होताच कसा विसरतो, असा प्रश्नही ॲड.मातेले यांनी उपस्थित केला.

मुळात आता किरकिऱ्या सोमय्याला भाजपमध्ये काहीच स्थान उरलेले नाही. त्यांना साध्या बैठकीसाठीही भाजप कार्यालयाकडून आमंत्रण येत नाही. किरकिऱ्याला आम्ही सर्वचजण हलक्यात घेतो. मात्र आमच्या दैवतेवर बोट उगारून किरकिऱ्याने आमच्या संयमाचा अंत पाहिला. अजूनही साठीपार थेरड्याचा एकेरी उल्लेख करणं आम्ही टाळतोय, मात्र त्याने माफी मागितली नाही तर मग किरकिऱ्याला वठणीवर आणल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा सज्जड दमही ॲड.मातेले यांनी भरला.