मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर बोलले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन होत असलेल्या आरोपांना धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहेत. मला अडचणीत आणण्यासाठी काही लोक एकत्र आले आहेत, असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरात ते बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “मला टार्गेट करण्यासाठी काही लोक एकत्र आले आहेत. फक्त बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचे आहोत का? असे प्रश्न आम्हाला विचारले जातात. आमचा एकमेव पक्ष आहे जो शीव-शाहू फुले यांच्या विचाराने चालतो.”
बीड जिल्ह्यात सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्याचं समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी ही हत्या केली त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. त्या 5-8 गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला, कोणी केला? आपल्या महायुतीचे आमदारांनी केले? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे. पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केल जातंय. माझ्यावर देखील निराधार व बिनबुडाचे आरोप करून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्याचा उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात मी नेहमी त्याच्यासोबत होतो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने केली. जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही. आता माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्यामागे उभा राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करु शकत नाही. अजितदादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंद आहे. दादांना शब्द देतो, मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. उद्या माझ्यावर पाँडेचरीची जबाबदारी दिली तरी मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन, असं धनंजय मुंडे म्हणाले.
पहाटेच्या शपथविधीच्या वेळी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका, हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले काही होत नाही. सुनील तटकरे याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं, असा मोठा दावा धनंजय मुंडे यांनी केला.