Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा आदेश काढावा लागला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेल्या गिरीश महाजन यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याने हे प्रकरण बरेच गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पालकमंत्र्यांचा यादी जाहीर करण्यापूर्वी दिल्लीला मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर फडणवीस परदेशात गेले होते. परंतु, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन तीव्र राजकीय पडसाद उमटले होते. त्यामुळे एरवी आपल्या निर्णयांवर ठाम राहणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना तातडीने आदेश जारी करत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली होती.

एकनाथ शिंदे हे पालकमंत्रीपदांच्या वाटपावरुन नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळगावी जाऊन बसल्याची चर्चा कालपासून रंगली आहे. शिवसेनेतील 20 आमदार फुटणार, या चर्चेने या सगळ्या अस्वस्थतेत आणखी भर टाकली. उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गटातील 20 आमदारांचा गट फुटून भाजपसोबत जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. या सगळ्याचा पालकमंत्री पदाच्या स्थगितीशी काही संबंध आहे का, अशी शंका आता घेतली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी साताऱ्यातील दरे या गावी जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून सर्वकाही आलबेल आहे, असे सांगितले जात असले तरी पडद्यामागे अजूनही धुसफूस आणि राजकीय घडामोडी सुरु असल्याचे सांगितले जाते.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत एसटी बसेस खरेदीची निविदाच रद्द केली होती. तसेच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेल्या संजय शिरसाट यांना आदेश काढून तातडीने ‘सिडको’च्या अध्यक्षपदावरुन पदमुक्त होण्यास सांगण्यात आले होते. या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.

भाजपची भूमिका काय?

एकनाथ शिंदे हे रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळण्यासाठी आग्रही होते. मात्र, ते न मिळाल्याने शिंदे नाराज झाले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केली होती. कोकणातील कोणत्याच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद न मिळाल्याने अदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आले. तर नाशिकमध्ये आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडेच राहावे, यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *