अभिजीत पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहींचे कॉल येत होते… तू कुठे आहेस… आपण बसू… मार्ग काढू… अरे आता कधी मार्ग काढणार… अगोदर काय गोट्या खेळत होतात का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता लगावला.

ठाणे जिल्ह्यातील अनेक लोक, मान्यवर राष्ट्रवादीत होते. पण ते एका माणसामुळे पक्ष सोडून गेले. का सोडून गेले याचे आत्मपरीक्षण त्यावेळी कुणीच केले नाही. त्यावेळी ती करण्याची आवश्यकता होती. माणूस काम करतो तो चुकतो मात्र एखाद्याने मुद्दाम चूका केल्या तर कोण सोबत शिल्लक राहणार नाही असाही टोला अजितदादा पवार यांनी लगावला.

नेता व पक्ष यांना व्हिजन हवे आणि सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जायचे असते आणि तशा पध्दतीने आपला पक्ष काम करत आहे.
राष्ट्रवादीची ताकद पक्षात येणाऱ्या अशा लोकांच्यामुळे वाढत असते. आपण बेरजेचे राजकारण करत आहोत. पक्षात नवीन आलेल्यांचा सन्मान केला जाईल… जुन्याचा मान राखला जाईल असा शब्दही अजितदादा पवार यांनी यावेळी दिला.

लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही असा शब्द राज्यातील बहिणींना देतानाच या योजनेचा खरंच लाभ त्याच बहिणींना मिळतोय का हे पाहिले जात आहे हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत सावलीसारखा राहणारा आणि सर्व राजकीय व्यवस्थापन सांभाळणारा त्यांचा स्वीय सहाय्यक आणि शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत पवार आणि प्रदेश सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह ठाणे शहर आणि मुंब्र्यातील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज महिला विकास मंडळ सभागृहात प्रवेश केला. हा जितेंद्र आव्हाड यांना मोठा दणका म्हटला जात आहे. अभितीत पवार आणि हेमंत वाणी हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या प्रवेशाने ठाणे शहर व मुंब्रात आव्हाडांच्या संघटनेला खिंडार पडले आहे.

या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *