kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दोन दिवसात मोठा धमाका, पुण्यातील मोठे नेते शिवसेनेत येणार, नावेही जाहीर करणार; उदय सामंत यांचा मोठा दावा

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज एक मोठा दावा केला आहे. आम्ही काही ऑपरेशन टायगर हे नाव ठेवलं नाही. तुम्ही (मीडियाने) हे बारसं केलं आहे. पण दोन दिवसात पुण्यातील काही नेते आमच्या पक्षात येणार आहेत. कोण कोण आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, त्यांची नावे मी सांगणार आहे, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे गटात आता कोण येणार? आणि कोणत्या पक्षाला खिंडार पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राजकीय वर्तुळात या नव्या भूकंपाचीच चर्चा सुरू आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. शिंदे गटाकडून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर बाबत बोलताना उदय सामंत यांनी थेट भाष्य केलं आहे. ऑपरेशन टायगर हे पत्रकारांनी नाव दिले आहे. मात्र महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यावरच विश्वास ठेवून ठाकरे गटातील अनेक नेते हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ते देखील कोणत्याही ऑपरेशनशिवाय, असं उदय सामंत म्हणाले.

महाविकास आघाडी सत्तेत येत असताना शरद पवार आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार हे इतरांच्या पक्षात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाहीत. मात्र काही लोकांनी ( उद्धव ठाकरे) स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून एकनाथ शिंदे यांना सांगितलं की शरद पवार यांचा आपल्या मुख्यमंत्री पदाला विरोध आहे. मात्र तरीही एकनाथ शिंदे यांनी ते मोठेपणाने स्वीकारलं, असं म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील महामानव आणि संतांवर आक्षेपार्ह ट्विट करत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्याविरोधात देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता कमाल खान यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत ट्विट केलं होतं. त्यानंतर राज्यभर संतापाचे लाट उसळली होती, याबाबत पत्रकारांनी विचारले असता सामंत यांनी हे उत्तर दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरूनही त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही, ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, महाराष्ट्रातील महापुरुषांचे कार्य त्यांना माहीत नाही, अशांना आम्ही इतिहास शिकवावा ही दुर्देवाची गोष्ट आहे. मी आज रेल्वे प्रवास करताना काही साहित्यिकांसोबत होतो. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेलं ट्विट पाहता या साहित्यिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.