पुण्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी रवींद्र धंगेकरांसह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही उपस्थित होते. रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली.
रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच एका वाहिनीशी संवाद साधताना यावर भाष्य केले आहे. “मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. जाताना मी लपून जाणार नाही. मला आवडलं म्हणून मी फोटो टाकलो. मी शिवसेनेत चाललो अशी परिस्थिती निर्माण झाली. उदय सामंत माझे मित्र आहेत, असे सूचक विधान रवींद्र धंगेकर यांनी केले.
दोन दिवसांपूर्वी शिवजंयती होती. यानिमित्ताने मी सर्व शिवभक्तांसाठी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते. मी मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो. एखाद्या सर्वसामान्याने केलेले फोटो किंवा रिलही मी स्टेटसला ठेवतो. माझा तो फोटो खूप चांगला आला होता. मला तो आवडला. त्यामुळे मी टाकला. प्रसारमाध्यमांनी त्यावर चर्चा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जुने शिवजयंतीचे फोटो टाकायला लागले. यानंतर मग मी शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
“हा रिल टाकायचा माझ्या डोक्यातला विषय नाही. बऱ्याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला त्यामुळे टाकला. मी आजारी होतो त्यामुळे तब्येत कमी झाली होती. त्या दिवशीचे अनेक फोटो आहेत. माझे सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत. अजितदादा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आपला जन्म भगव्या उपरणातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटतं. ऑफर देण्यात काहीही चूक नाही. मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. मी काँग्रेसमध्ये काम केलंय. काँग्रेस पक्ष प्रचंड चांगला आहे”, असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
“माझं सोशल मिडिया कार्यकर्ते मॅनेज करतात. मी काँग्रेसमध्ये चांगल काम केलं आहे. हा चांगला पक्ष आहे. गेल्या 2-3 महिन्यांत मी आमदार नसल्यामुळे मला जास्त कुणी भेटायला येत नाही. कार्यकर्त्यांसोबत मला बोलावच लागणार आहे. भगवं टाकलं काही हरकत नाही, मात्र माणुसकी आपला धर्म आहे. दुष्मनालाही आपण मदत करतो. मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. पण जाताना मी लपून जाणार नाही. माझं मत सांगितलं रस्त्यावर लढू. कार्यकर्त्यांसोबत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी बोलणार आहे. यंत्रणेला टक्कर द्यायची तर मैत्री वाढवावीच लागणा आहे. अधिकारी सत्तेचे गुलाम असतात”, असेही ते म्हणाले.