विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी २०२४-२५च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार असल्याने, सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे. मुख्य म्हणजे, पुरेसे संख्याबळ हातात नसतानाही राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि मंत्र्याच्या राजीनाम्याबाबत विरोधक नेमकी कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.
मुंबईतील विधानभवनात सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त राखण्यात आला आहे. याशिवाय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळ सचिवालयाची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत सुरू राहणार असून सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून कोणत्या घोषणांचा पाऊस पाडण्यात येतो, हा औत्सुक्याचा विषय आहे.
दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा, बीड हत्याकांडमुळे चर्चेत आलेले मंत्री धनंजय मुंडे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारखे मुद्दे हाताशी असताना विरोधक नेमकी कोणती भूमिका मांडतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीकडे पुरेसे असे संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची आणि सभागृहातील भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.