पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प सोडला आहे. हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज मांडलेला ऐतिहासिक असा अकरावा अर्थसंकल्प म्हणजे, शाश्वत विकासाचा शिस्तबद्ध संकल्प आहे. अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कौतुक केले.

कोरोना काळापासून केवळ देशाचीच नव्हे तर जगभरातील अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसमोर देखील अनेक आर्थिक आव्हाने असतानाही राज्याच्या विकासाची गती कमी होणार नाही तर ती आणखी कशी वाढेल अशी दिशा या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते असेही सुनिल तटकरे म्हणाले.

विविध विकासाचे लहान मोठे प्रकल्प, व्यक्तीगत आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या योजना व पायाभूत सुविधांवर अधिकाअधिक लक्ष केंद्रीत करणारा हा अर्थसंकल्प आहे.आर्थिक दुर्बल घटकांना सन्मानाने जगण्याची संधी देतानाच बळीराजा, लाडक्या बहिणी, अल्पसंख्याक, आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांगाचा सन्मान अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात केला आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

शहरी व ग्रामीण, शेती व उद्योग, दळणवळण ते आधुनिक तंत्रज्ञानासह विकसित राष्ट्र व विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप म्हणजे हा अर्थसंकल्प आहे.शिक्षण,आरोग्य, पर्यावरण, पर्यटनासोबतच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा व शौर्याचा सन्मान करणारी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महापुरूषांच्या देदिप्यमान कारकिर्दीची भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आजच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध स्मारके आणि ऐतिहासिक स्थळांचा यथोचित विकास असा हा अर्थसंकल्प आणि महायुती सरकारची भूमिका अधोरेखित करते अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *