नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या निर्णयाविरोधात प्रदर्शन करून काँग्रेस पक्ष जनतेची दिशाभूल करत आहे. हे प्रकरण २०१२ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचेच सरकार होते. तेव्हा त्यांनी भाजपला दोष देणे चुकीचे आहे. या प्रकरणात काही घोटाळा नसेल तर काँग्रेस नेत्यांनी ईडी आयकर नोटीसांना उत्तर द्यावे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाईक म्हणाले की, काँग्रेसला देशभरातील सर्व मालमत्ता आपलीच असे वाटते. त्यांना आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत आणि जनतेला काहीच समजत नाही असे वाटते. या मानसिकतेतूनच सध्या काँग्रेस देशभरात धरणे आंदोलन करत आहे.
मुळात नॅशनल हेराल्ड प्रकरण १ नोव्हेंबर २०१२ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्डची मालमत्ता लुबाडण्याचा आरोप केला होता.
ते म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी नॅशनल हेराल्डची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर केली आहे. त्यावेळी नॅशनल हेराल्डला काँग्रेस पक्षाने ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. काँग्रेस नेत्यांनी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवीन कंपनी स्थापन केली. नॅशनल हेराल्ड वरील ९० कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात त्यांची अडीच हजार कोटी रुपयांची मालमत्ता यंग इंडियाच्या नावे केली. यंग इंडियामध्ये सोनिया आणि राहुल गांधी हे प्रत्येकी ३८ टक्के भागधारक आहेत.
काँग्रेस पक्ष हा पैशांची देवाण घेवाण करणारी मनी ट्रान्स्फर कंपनी नाही. तरी देखील त्यांनी यंग इंडिया सोबत आर्थिक देवाण-घेवाण केली आहे. सध्या काँग्रेस आंदोलन करून धमकीची भाषा वापरत आहे. ते या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच अर्थ हा पक्ष आधी चोरी करून आता शिरजोरपणा करत आहे. भाजपतर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आम्ही नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची खरी माहिती घराघरात पोहोचवणार असल्याचे दामू नाईक यांनी सांगितले.
Leave a Reply