कर्नाटकातील जीडीएस नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला घरकाम करणाऱ्या महिलेवरील बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रेवण्णाला १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेला ७ लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयानं रेवण्णाला १ ऑगस्टला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज त्याला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाचा निकाल ऐकताच रेवण्णा भावुक झाला. त्याला रडू कोसळलं. लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणींसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयानं रेवण्णाला ही शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयानं प्रज्ज्वल रेवण्णाला भारतीय दंड सहितेच्या कलम ३७६ (२) (के) आणि ३७६ (२) (एन) च्या अंतर्गत शिक्षा सुनावली आहे. सोबतच न्यायालयानं त्याला १० लाखांचा दंडदेखील ठोठावला आहे. पीडितेला ७ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहे. ही शिक्षा आजपासून लागू झालेली आहे. त्याला या प्रकरणी शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले होते. रेवण्णाला बलात्कार, लैंगिक छळ, पुरावे नष्ट करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले. रेवण्णाच्या अटकेनंतर जवळपास १४ महिन्यांनी आणि हा खटला सुरू झाल्यानंतर आठ आठवड्यांच्या आत न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा निकाल सुनावला. शुक्रवारी ज्यावेळी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले त्यावेळी तो न्यायालयात होता. त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
जवळपास १४ महिन्यांत या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे. हासन जिल्ह्यातील होळेनरसीपूर येथील एका फार्महाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा याला ही शिक्षा सुनावली आहे. दीड वर्षापूर्वी अनेक महिला अधिकाऱ्यांसह अनेक महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. लैंगिक अत्याचार, बलात्कार प्रकरणी प्रज्वल रेवण्णा याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
प्रज्वल हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू तर केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा १९९६ मध्ये पंतप्रधान झाले होते. पण त्यांचा कार्यकाळ वर्षभरापेक्षा कमी राहिला.














