लोकसभेत मंगळवारी ‘पेपर लीक’ विरोधी विधेयकावर चर्चा सुरू झाली आणि ती आज (29 जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी बुधवारीदेखील सुरू आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी या विधेयकावरील चर्चेत सहभागी होणार असून ते दुपारी सुमारे 12:30 वाजता आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. चर्चेनंतर या विधेयकावर लोकसभेत मतदान होण्याची शक्यता आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते पुढील मंजुरीसाठी राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी आज बुधवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. या विधेयकावरील चर्चा दुपारी 12 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे सार्वजनिक परीक्षा (दुरुस्ती) विधेयक, 2026 लोकसभेत मांडले आहे. परीक्षांमधील पेपरफुटी, गैरव्यवहार, कॉपी तसेच इतर अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि संबंधित कायदेशीर तरतुदी अधिक कठोर करण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आदल्या दिवशी सीपीएमच्या (CPM) दिल्ली कार्यालयावर टाकण्यात आलेल्या छाप्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी या कारवाईला लोकशाहीविरोधी पाऊल म्हणत सरकारवर टीका केली. याला उत्तर देताना सभागृहाचे नेते जे.पी. नड्डा यांनी ही घटना एक सामान्य बाब असल्याचे सांगितले आणि आपण स्वतः विद्यार्थी कार्यकर्ता असताना दोनदा अटक झाल्याचे नमूद केले.












Leave a Reply