आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरू आहे. मानाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याची विवध शहरांमध्ये धूम सुरू आहे. भाविक भक्ती भावात न्हाऊन निघाले आहे. लालबाग-परळ परिसर तर गर्दीने फुलून गेला आहे आणि लालबाग च्या राजाच दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.लालबागच्या राजाच्या मुख दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागली आहे. राज्यातही अनेक शहरात, गाव खेड्यात गणेशोत्सवाचा आनंद सोहळा सुरू आहे. दीड दिवसांचा, पाच दिवसांचा, दहा दिवसांच्या घरगुती गणपत्तीचे आगमन आज होत आहे.
देशातल्या सर्वात श्रीमंत गणेश बाप्पा म्हणजे जीएसटी सेवा मंडळचे 71 वा वर्ष आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी देखील इथे भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. सर्वात महत्त्वाचं या बाप्पाच्या वैशिष्ट्य आहे की इथं भाविकांची सुरक्षा आणि त्यांना योग्य पद्धतीने दर्शन व्हावं याची पुरेपूर काळजी घेतली जाते. मंडळातर्फे यंदा एकूण 474 कोटींचा विमा काढण्यात आला आहे. बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास 69 किलो सोना आणि 365 किलो चांदीने शृंगार करण्यात आला आहे. नवसाला पावणारा विश्वाचा राजा म्हणून या गणपति बाप्पाची ओळख आहे.
मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले गणेश गल्ली येथील मंडळाचे यंदा 98 वं वर्ष आहे. गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा सजावटीसाठी रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक थीममुळे आधीच प्रतिष्ठित असलेल्या या उत्सवाला अधिक भव्यता लाभली आहे, असे मत मुंबईचा राजा मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील परब आणि उपाध्यक्ष सिद्धेश कोरगावकर यांनी व्यक्त केले.
मुंबईतील गिरगावकरांचं बाप्पाला साकडं घालणारे बॅनर लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर ” हे गणराया यंदा मुंबई महानगरपालिकेत मुंबईकरांच्या मनातील व मराठी माणसाच्या हक्काचे ठाकरे बंधूंचे सरकार येऊ दे ” असा आशय लिहिला आहे. गिरगाव, दादर,चर्नीरोड परिसरात गणपती निमित्त ठाकरे बंधूंचे मनपात सरकार यावं या आशयाचं बॅनर लागलं आहे.
पुण्यातील गणपतींची प्राणप्रतिष्ठा वाजत गाजत होणार आहे. गणरायाच्या आगमनासाठी पुण्यातील मंडळ सज्ज झाली आहेत. त्यात मानाचा पहिला ग्रामदैवत श्री कसबा गणपती, प्राणप्रतिष्ठापना थोड्याच वेळात होईल. श्रींच्या आगमन मिरवणुकीत अबालवृद्ध थिरकले आहेत. ढोलताशांचा गजर होत आहे. भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सगळं वातावरण भक्तीमय झालं आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाच्या गणेशोत्सवाची आज पासून सुरुवात होते आहे. गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्यनगरी मध्ये सकाळपासून नागरिकांना मध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शतकोत्तर परंपरा असलेले अनेक गणेश मंडळे पुण्यात आहेत. पुण्यातील मुख्य आकर्षण आणि श्रद्धचे अधिष्ठान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठीचा हा रथ आहे. या रथाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. सोबतच रथावरती विष्णूंची मूर्ती देखील विराजमान करण्यात आली आहे. सोबतच या सगळ्या विष्णूच्या मूर्तीला फुलांनी सजवण्यात आले आहे.













