पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे कथित ‘लव्ह जिहाद’चे एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. डहाणूतील दोन सख्ख्या बहिणींना एका विशिष्ट समुदायाच्या तरुणाने जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हिंदू मुलींना फूस लावून त्यांच्यावर अत्याचार करण्याचे हे सत्र अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय नेत्यांनी डहाणूमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. या धक्कादायक घटनेमुळे डहाणू परिसरात सध्या तीव्र पडसाद उमटत असून, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे प्रकरण?
डहाणू येथील या प्रकरणात 1 जून रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी सध्या फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी मोठ्या हिंदू मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिच्याच अल्पवयीन लहान बहिणीलाही स्वतःच्या जाळ्यात ओढले.
या दोन्ही बहिणींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून त्यांना सातत्याने ब्लॅकमेल केले जात होते आणि त्यांच्यावर अत्याचार केला जात होता. या प्रकारामुळे पीडित कुटुंबीय प्रचंड दबावाखाली होते, अखेर धाडस करून त्यांनी पोलिसांत धाव घेत या अत्याचाराला वाचा फोडली.
या कथित लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती मिळताच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी थेट डहाणू पोलीस ठाण्याला भेट दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. या प्रकरणाला कथित लव्ह जिहादचे स्वरूप असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आरोपीच्या अनधिकृत मालमत्तांवर तात्काळ बुलडोझर चालवण्याची मागणी केली.
पालघर आणि डहाणू परिसरातील गरीब तसेच आदिवासी मुलींना वेगवेगळ्या प्रकारे जाळ्यात ओढून थेट परदेशात, विशेषतः लंडनला पाठवण्याचे मोठे रॅकेट येथे सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या गंभीर प्रकाराबाबत त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत. तसेच गुजरात राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही आंतरधर्मीय विवाहांबाबत मुलीच्या कुटुंबीयांना आधी अधिकृत माहिती देणारा कडक कायदा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
या संवेदनशील प्रकरणाचा तपास डहाणू पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 2 विशेष पथके तात्काळ परराज्यात रवाना करण्यात आली आहेत. आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर छापे मारले जात असून, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या लव्ह जिहादच्या कथित प्रकरणामुळे डहाणू शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांचे डोळे आता पोलिसांच्या कारवाईकडे लागले आहेत.















Leave a Reply